
बेळगाव : बेळगाव शहरातील ज्योती कॉलेज मैदानावर पारंपरिक पद्धतीने दरवर्षी होणाऱ्या रितिरिवाजाप्रमाणे सीम्मोल्लंघन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सिद्ध भैरवनाथ मंदिरात शनिवारी सायंकाळी शहरातील पारंपरिक पद्धतीने ज्योती कॉलेज मैदानावर होणारे सीम्मोल्लंघन वेळेत पूर्व व्हावे याचे नियोजन करण्यासाठी शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रणजित चव्हाण- पाटील यांच्या नेतृत्वाखाली नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रणजित चव्हाण- पाटील होते.

यावेळी शहर देवस्थान कमिटीच्या वतीने शहरातील मुख्य सासनकाठ्या आणि पालखी पंचाना सीम्मोल्लंघन दिवशी वेळेत हुतात्मा चौकात एकत्रित या अश्या सूचना देण्यात आल्या.
या सोहळ्याला एक लाख भाविक जमण्याची शक्यता असून गर्दीने त्रास होऊ नयेत म्हणून मोठे रिंगण करून त्यात पालख्या ठेवण्यासाठी चौक मार्किंग करावे जेणे करून पालख्यांचे सर्वांना दर्शन घेता येईल अशी सोय करण्याचा निर्णय झाला. यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडूस्कर, पीआरओ विकास कलघटगी, राहुल मुचंडी, विठ्ठल पाटील, गणपत चौगुले, प्रथमेश अष्टेकर आदी उपस्थित होते.
ज्योती मैदान सीमोल्लंघन कार्यक्रमासाठी जाहीर आवाहन
दरवर्षीप्रमाणे बेळगाव शहर देवस्थान मंडळाच्यावतीने येत्या मंगळवार दि. 24 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 4:30 वाजता मराठी विद्यानिकेतन, ज्योती कॉलेज मैदानावर भव्य सीमोल्लंघन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
दरवर्षी सीमोल्लंघनादिवशी चव्हाट गल्लीतील पंच कमिटीच्यावतीने श्री ज्योतिबा देवाची सासनकाठी व नंदी (कटल्या) यांची विधिवत पूजा झाल्यानंतर ते मुख्य मिरवणुकीसाठी मार्गस्थ होतात. दरम्यान शहरातील इतर देवी-देवतांच्या पालख्या व शासन काठी देखील शहरातील हुतात्मा चौक येथे जमतात. त्यानंतर पालख्या ज्योती कॉलेज येथील सिमोल्लंघन मैदानाकडे मिरवणूक वाजत गाजत मार्गस्थ होते. मैदानावर बेळगावचे वतनदार पाटील यांच्या घराण्याकडे असलेल्या पारंपारिक तलवारीचे शस्त्र पूजन चव्हाण पाटील परिवार व देवस्थान मंडळाकडून केले जाते. यानिमित्ताने बेळगाव शहर देवस्थान मंडळाच्यावतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कारही केला जातो. यंदा देखील याचप्रमाणे सर्व कार्यक्रम होणारा असून शहरातील सर्व देवस्थान मंडळांचे मानकरी, पुजारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, पंचमंडळ, युवक मंडळ व नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून तो यशस्वी करावा, असे आवाहन बेळगाव शहर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील आणि सेक्रेटरी परशराम माळी यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta