
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी गटातील वाद आता थेट बेंगळूरच्या राजभवनात पोहोचला आहे. महापौर शोभा सोमनाचे यांनी नगरसेवकांच्या शिष्टमंडळासह राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन महापालिकेच्या कारभारात जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्तक्षेपाविरोधात तक्रार केली आहे.
करवाढीच्या ठरावात बेकायदा दुरुस्ती, महापौरांच्या सहीची फाईल गहाळ होणं आदी कारणावरून बेळगाव महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी गटात बेबनाव निर्माण झाला आहे. हा वाद आता थेट राजभवनात पोहोचला आहे. महापौर शोभा सोमनाचे यांनी सत्ताधारी नगरसेवकांच्या शिष्टमंडळासह आ. अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन कैफियत मांडली. महापालिकेच्या कारभारात मंत्री सतीश जारकीहोळी ढवळाढवळ करत आहेत. त्यामुळे ते सुरक्षितपणे काम करू शकत नसल्याची तक्रार केली आहे. त्याशिवाय महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या विरोधात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले. या भेटीवेळी आमदार अभय पाटील, माजी आमदार अनिल बेनके, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवठगीमठ व सत्ताधारी गटातील नगरसेवक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta