विविध गावातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आयोजित मराठी भाषिक महामेळाव्यासाठी सर्व पातळीवर जनजागृती केली जात असून शिव- समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विविध गावातील शेतशिवारापर्यंत जाऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
रविवारी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली शिव-समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागाचा दौरा करून महामेळाव्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली.
ग्रामीण भागातील शेतकरीवर्ग शिवारात शेतीकामात व्यस्त असल्याने शिव-समितीच्या कार्यकर्त्यांनी शेती शिवारापर्यंत जाऊन महामेळाव्यासंदर्भात जनजागृती करताना मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
बिजगर्णी, बडस, कावळेवाडी, हिंडलगा, गणेशपुर आदीसह अन्य गावातील युवकांच्या गाठीभेटी घेऊन मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संघटक रवींद्र जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक महेश टंकसाळी, महाराष्ट्र एकीकरण समितीचे सचिन बाळेकुंद्री यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी, शिवसैनिक व समिती कार्यकर्ते उपस्थित होते.