
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बुधवार दि. 1 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. जवळपास आठ महिन्यानंतर या खटल्याला गती मिळाली आहे. मागील 3 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी प्रलंबित आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये सुनावणी झाली होती त्यानंतर 1 नोव्हेंबर काळ्यादिनी सीमाप्रश्नी सुनावणी असल्यामुळे सीमावासीयांसाठी हा औत्सुक्याचा क्षण ठरणार आहे.

तांत्रिक अडचणीमुळे सीमाप्रश्नी सुनावणी लांबणीवर पडत आहे. या खटल्यात त्रिसदस्यीय खंडपीठाची रचना करण्यात आली आहे. त्यामध्ये बऱ्याच वेळेस महाराष्ट्र किंवा कर्नाटकातील न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येत असल्यामुळे खटल्याची सुनावणी लांबणीवर पडत होती. मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीने याबाबत वारंवार पाठपुरावा करत महाराष्ट्र सरकारला त्रिसदस्यीय खंडपीठात त्रयस्त न्यायमूर्ती नेमण्यात यावी जेणेकरून या खटल्याला गती मिळेल अशी मागणी केली होती. त्यानुसार बुधवारी 1 नोव्हेंबर रोजी सीमाप्रश्नी सुनावणी होणार आहे. यापूर्वी 22 डिसेंबर रोजी सुनावणी होणार होती पण त्रिसदस्यीय खंडपीठात कर्नाटकच्या न्यायमूर्तींची नियुक्ती केली होती त्यामुळे सुनावणी लांबणीवर पडली होती. या सुनावणीत न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठांसमोर ही सुनावणी होणार आहे. 1 नोव्हेंबर काळ्यादिनी होणाऱ्या या सुनावणीकडे समस्त सीमावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta