येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी युवा संघटनेच्या वतीने आयोजित संगीत भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवार (ता. 29) रोजी परमेश्वर नगर येळ्ळूर येथील नेताजी मराठी सांस्कृतिक भवनमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेताजी युवा संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक युवराज हुलजी, माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, नेताजी को -ऑप सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील, व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे, संघटनेचे खजिनदार प्रा. सी. एम. गोरल, माजी चेअरमन संजय मजूकर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी उद्योजक युवराज हुलजी व गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांच्या हस्ते ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उद्योजक युवराज हुलजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यानंतर नेताजी युवा संघटनेच्या वतीने पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक नेताजी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील यांनी केले.
यावेळी बोलताना उद्योजक युवराज हुलजी म्हणाले, एखादी कला माणसाने जोपासली असता त्या कलेचा गौरव होतो व ती कला अजरामर होते यासाठी प्रत्येकाने कोणती ना कोणती कला जोपासावी भजन व संगीत याही महत्त्वाच्या कला आहेत या कला जोपासणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. यावेळी गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांनी नेताजी युवा संघटनेच्या कार्याचा गौरव केला. या स्पर्धेत श्रीहरी संगीत कला मंच कल्लेहोळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, तर मुक्त ग्रुप महिला भजनी मंडळ टिळकवाडी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला असून, रवळनाथ भजनी मंडळ गोल्याळी व विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ कुद्रेमनी, चौथा क्रमांक सुद्धा विभागून देण्यात आला असून, हनुमान भजनी मंडळ हब्बनहट्टी व थळेश्वर भजनी मंडळ हंदीगनूर, पाचवा क्रमांकही विभागून देण्यात आला असून, शिव गणेश भजनी मंडळ दारोळी व धन्य ते माता-पिता भजनी मंडळ बाकनुर यांना देण्यात आला आहे. वरील सर्व भजनी मंडळांना नेताजी युवा संघटनेच्या वतीने स्मृती चिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकाचे बक्षीस युवराज हुलजी यांच्या हस्ते संगीत कला मंच कल्लेहोळ या भजनी मंडळाला देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते इतरही सर्व क्रमांक मिळवलेल्या भजनी मंडळांचा स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन नेताजी युवा संघटनेचे सेक्रेटरी के. एन. पाटील यांनी केले. तर आभार प्रा. सी. एम. गोरल यांनी मानले. यावेळी रवींद्र गिंडे, परशराम गिंडे, गणपती हट्टीकर, भोमाणी छत्र्यानावर, शंकर मुरकुटे, पांडुरंग घडी, अनिल मुरकुटे, रविकांत पाटील, वसंत मुचंडी, जोतिबा पाटील, दीपक हट्टीकर, चांगदेव मुरकुटे आदी यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta