बेळगाव : सहकार क्षेत्रातील अग्रेसर दि. बेळगाव बेकर्स को-ऑप. क्रेडिट सोसायटीतर्फे सभासदांच्या गुणवंत मुला-मुलींचा सत्कार समारंभ ताशिलदार गल्ली येथील सोसायटीच्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन राजाराम सूर्यवंशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून दि. सेंट्रल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. विश्वजीत अमृतराव हसबे उपस्थित होते.
तसेच व्यासपीठावर व्हाईस चेअरमन सौ. सुरेखा मेलगे, संचालक शिवाजीराव जाधव, विजय पाटील, शिवाजी हंगीरकर, शंकर पाटील, शंकर गडकरी, गजानन बसरीकट्टी, श्रीमती कल्पना पावशे, श्रीमती रेखा कणबरकर, सल्लागार नेताजी जाधव, विनोद हंगीरकर उपस्थित होते. सेक्रेटरी सागर शहापूर यांनी सर्वांचे स्वागत केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. मुलांनी अभ्यासाबरोबर चांगल्या सवयी आणि चांगले संस्कार जोपासण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत. मोबाईलचा अतिवापर टाळला पाहिजे. बेकर्स सोसायटीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून मुलांना प्रोत्साहन देण्याचा जो उपक्रम चालवला आहे तो कौतुकास्पद आहे, असे उदगार प्रमुख पाहुणे हसबे यांनी याप्रसंगी बोलतांना काढले.
त्यानंतर नेताजी जाधव, शिवाजी हंगीरकर व राजाराम सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर एस. एस. एल. सी. व विविध पदवी परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांसह सभासद विद्यार्थी व पालक उपस्थित होते. विनायक सायने यांनी सर्वांचे आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta