बेळगाव : मुतगा पीकेपीएसमध्ये गैरव्यवहाराचा आरोप करत जोपर्यंत व्यवहाराची चौकशी होत नाही तोपर्यंत आपण इथून उठणार नाही असा निर्धार मुतगा येथील शेतकऱ्यांनी केला असून मुतगा येथील युवा शेतकरी सचिन पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. पंधरा दिवसांपूर्वी मुतगा येथील शेतकऱ्यांनी पीकेपीएस संस्थेमध्ये गैरव्यवहार झाला असून त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी डीसीसी बँकेचे अधिकारी, एआर व डीआर यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. शुक्रवारपासून येथील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले असून जोपर्यंत गैरव्यवहाराची चौकशी होत नाही तोपर्यंत आपण इथून उठणार नाही असा निर्धार या शेतकऱ्यांनी केला आहे. संघाचे 2011 पासून ते 2023 पर्यंत एकदाही सरकारी ऑडिट झालेले नाही. यावर्षी देखील बॅलन्स शीट व ऑडिट नसताना सभासदांना अंधारात ठेवून वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली आहे तसेच शून्य टक्के व्याजदराने सरकारकडून कर्ज न देता संघातील रक्कम कर्ज म्हणून शेतकऱ्यांना देण्यात आली आहे त्यामुळे शेतकरी शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहणार आहेत. या सर्व गोष्टीचा संचालक मंडळाने खुलासा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जोपर्यंत या संघाची चौकशी होत नाही व संचालक मंडळ याबाबत खुलासा करत नाही तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार सचिन पाटील या युवा शेतकऱ्याने केला आहे. याची माहिती श्रीराम सेनेचे अध्यक्ष व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांना मिळताच त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली व समस्या जाणून घेतल्या. सोमवारी आपण जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट घेऊन सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचे आश्वासन यावेळी रमाकांत कोंडुसकर यांनी दिले व उपोषणाला आपला पाठिंबा व्यक्त केला. शुक्रवारपासून शेतकऱ्यांनी सदर आंदोलन सुरू केले असून चेअरमन किंवा संचालक मंडळ यापैकी कोणीही या ठिकाणी फिरकले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. न्याय व हक्कासाठी शेतकऱ्यांनी ठिया आंदोलन मांडले असून हे आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta