बेळगाव : येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालय आणि राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या कॉमर्स आणि मॅनेजमेंट विभागाच्या संयुक्त आश्रयात एकदिवसीय अभ्यास पाठ्यक्रम कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख अतिथी आणि वक्ताच्या रूपाने राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या कॉमर्स आणि मॅनेजमेंटचे बी.ओ.एस. चेअरमन प्रो. एच. वाय. कांबळे हे उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. जे. मोळेराखी यांनी भूषविले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरकारी महाविद्यालय हुक्केरीचे प्रा. वाय. एस. डांगे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची प्रस्तावना प्रस्तुत केली.
प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना प्रो. एच. वाय. कांबळे म्हणाले की, शिक्षकांनी पाठ्यक्रमाचे सखोल अध्ययन करून त्याला विद्यार्थ्यांच्या समोर नाविन्यतेने प्रस्तुत करून त्यांना परिपूर्ण ज्ञान देण्याचे कार्य केले पाहिजे. भविष्यात हेच ज्ञान त्यांना रोजगार प्राप्त करून देते. यावेळी राणी चन्नम्मा विद्यापीठाचे वाणिज्य विभागाचे डॉ. एस. सी. पाटील म्हणाले की, आजच्या युगामध्ये वाचन संस्कृती कमी झाली आहे. शिक्षकांनी स्वतः अनेक पुस्तकाचे वाचन करून विद्यार्थ्यांना सुद्धा वाचनप्रिय बनविण्याचे कार्य केले पाहिजे. वाचनामुळे अनुभवांमध्ये वृद्धी होत असते.
शेवटी प्राचार्य डॉ. एच. जे. मोळेराखी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या समोर वावरत असताना विवेक पूर्ण आणि नीतिमूल्य जपून वागावे. शिक्षकांच्या मुळेच विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची निर्मिती होत असते.
यावेळी व्यासपीठावर भरतेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कांबळे, जैन महाविद्यालयाचे प्रा. सुनील देसाई आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अपेक्षा गुप्ते यांनी केले तर शेवटी प्रा. नंदकिशोर हिरेमठ यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाला अनेक प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta