बेळगाव : बेळगाव शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढिगारे पाहून नागरिकांतून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांनी शहराच्या स्वच्छतेचे काम योग्य प्रकारे करीत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना सकाळपासूनच समर्थकांसह जागोजागचा कचरा जमा करून तो ट्रॅक्टरमध्ये भरला आणि तो थेट विश्वेश्वरनगर येथील महापालिका आयुक्तांच्या घरासमोर टाकला.
सर्वसामान्य जनता परिसरात साचलेल्या दुर्गंधीयुक्त कचऱ्यापासून कशी हैराण आहे, याचा अनुभव आयुक्तांनाही यावा यासाठी आमदारांनी ट्रॅक्टरचे टेअरिंग हाती घेऊन थेट विश्वेश्वरय्या नगर गाठून ट्रॅक्टरमध्ये भरलेला कचरा आयुक्तांच्या घरासमोर खाली केला.
यासंदर्भात बोलताना अभय पाटील म्हणाले, मी मागील अनेक दिवसांपासून शहर-परिसरात साचणाऱ्या कचऱ्याबद्दल आणि यामुळे सर्वसामान्य लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल आयुक्तांना कळविले होते. याची दखल घेऊन शहर-परिसर स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा तो कचरा तुमच्या घरासमोर टाकेन, असा इशारा आयुक्तांना दिला होता. मात्र, आयुक्तांनी ठोस पाऊल न उचलल्याने शहर-परिसरातील कचऱ्याचे ढिगारे कार्यकर्त्यांसह जमा करून तो कचरा आयुक्तांच्या घरासमोर टाकण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यापुढेही शहर स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यास दर रविवारी आम्ही परिसर स्वछ करून जमाणारा कचरा जमा करून तो आयुक्तांच्या घरासमोरच टाकला जाईल, असे आमदार अभय पाटील यांनी सांगितले आहे. या उपक्रमाने तरी आयुक्त जागे होऊन स्वछता कंत्राटदारांवर अंकुश ठेवून शहर स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतील का ? असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.