बंगळूर : बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधमध्ये सोमवार दि. ४ पासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर जोरदार खडाजंगी रंगण्याची चिन्हे आहेत. पाच राज्यांतील निकालाचेही पडसाद सभागृहात उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाच राज्यांच्या निकालात भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. परिणामी भाजपकडून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होणार आहे. विरोधी पक्षनेत्यांची निवड भाजपने केल्याने भाजपकडून संघटित प्रयत्न केले जाणार असून त्यांना निजदची साथ मिळणार आहे. सत्ताधारी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
विरोधी पक्षनेतेपदी भाजपने माजी उपमुख्यमंत्री आणि विधान सभेच्या निवडणुकीत सलग सातवेळा विजय मिळविलेले आर. अशोक यांची नेमणूक केली आहे. ते पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहातील कामकाजात सहभागी होणार आहेत. परिणामी भाजप आमदारांमध्ये उत्साह आहे. विधानपरिषदेतही विरोधी पक्षनेते, उपनेते आणि प्रतोदांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. राज्यात भाजप-निजदची युती झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. दोन्ही पक्षांनी सत्ताधाऱ्यांना एकत्रितपणे जेरीस आणण्याचा निर्धार केला आहे. याबाबत निजद नेते कुमारस्वामी, विरोधी पक्षनेते अशोक आणि भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांची बैठक झाली आहे. त्यांनी सभागृहात एकत्रित लढण्याची रणनीती आखली आहे. अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी आवश्यक मुद्दे विरोधकांकडे आहेत.