निपाणी (वार्ता) : येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयात भ्रष्टाचाराचे प्रकार घडत आहेत. आपण अतिथी शिक्षक असून लाच न दिल्याने थकीत वेतन अदा न करता तबस्सुम गणेशवाडी यांना कामावरून कमी करण्यात आल्याची तक्रार अतिथी शिक्षक असलेल्या जावेद गणेशवाडी आणि तबस्सुम गणेशवाडी दाम्पत्यांने केली. तरीही कोणतीच कारवाई होत नसून याप्रश्नी आप पार्टीच्या वतीने आवाज उठविणार असल्याची माहिती डॉ. राजेश बनवन्ना यांनी पत्रकार बैठकीत दिली.
डॉ. बनवन्ना म्हणाले, गणेशवाडी दाम्पत्यांनी दिलेल्या माहिती नुसार हे दाम्पत्य गेल्या २ वर्षांपासून मानकापूर कन्नड सरकारी शाळेत दोन वर्षांपासून अतिथी शिक्षक म्हणून इंग्रजी अध्यापनासाठी कार्यरत आहेत.
गेल्या १९ ऑगष्टला निपाणी कार्यालयातील सीआरसी राजेंद्र कोकणे यांनी कार्यालयामध्ये येण्यास सांगीतले. येथे त्यांनी प्रत्येकी ३२ हजार रूपये लाच देण्याची मागणी केली. लाच देण्यास गणेशवाडी यांनी नकार दिल्याने त्या दोघांचाही वेतन काढलेले नाही. तर तबस्सुम गणेशवाडी यांचे अतिथी शिक्षक म्हणून नाव कमी करण्यात आले. त्यावर त्यांची योग्य शैक्षणिक पात्रता नसल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात कमी शैक्षणिक पात्र असलेले अतिथी शिक्षक सदर शाळेतच कार्यरत आहेत.
याबाबत शिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांना तक्रार करून देखील कोणतीच कारवाई न झाल्याने सदर दाम्पत्यांनी आम आदमी पक्षाकडे याबाबत तक्रार केली आहे. याविषयी शिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांची भेट घेतली. नाईक यांनी संबंधितांची चौकशी करून कारवाई करावी जेणेकरून भविष्यात अशा प्रवृत्तीला आळा बसेल. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. अशी मागणी करण्यात आली. शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ कारवाई करण्याची ग्वाही दिल्याची माहिती डॉ. राजेश बनवन्ना यांनी दिली.