
बेळगाव : बेळगावमध्ये पहिला जेएन-1 व्हायरसचा कोविड रुग्ण आढळला आहे. जेएन-1 कोविडचा पहिला रुग्ण आढळून आल्याने बेळगावात खळबळ उडाली आहे. केरळमध्ये कोविडच्या जेएन-1 व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्या पाठोपाठ या व्हायरसची लागण झाल्याने राजधानी बेंगळूरमधील एका ६४ वर्षीय रुग्णाचा पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी नुकतेच जाहीर केले होते. सरकारी पातळीवर या व्हायरसचा राज्यात फैलाव होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात असतानाच आता बेळगावात या व्हायरसची बाधा झालेला पहिला रुग्ण आढळल्याने भीती पसरली आहे. संपूर्ण जगाला प्रभावित करणार्या कोविड लाटेचा पहिला आणि दुसरा टप्पा बेळगाव जिल्ह्यातही यशस्वीपणे पार पडला. गेल्या वेळी घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जेएन-1 कोविड म्यूटेटेड स्ट्रेनला सामोरे जाण्यासाठी सर्व तयारी केली आहे. मात्र आज बेळगावात बीम्स हॉस्पिटलमध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट केलेल्या एका सरकारी अधिकाऱ्याची कोविड संसर्गाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या अधिकाऱ्याला गेल्या एक आठवड्यापासून खोकला आणि सर्दीचा त्रास होत होता. डॉक्टरांच्या सल्ल्याने हा अधिकारी होम आयसोलेशनमध्ये आहेहे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बेळगावातील जनता चिंतेत आहे. कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जनतेने खबरदारी घ्यावी, मास्क वापरावे, सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर राखावे आणि निरोगी राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta