
बेळगाव : ‘पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना बालपणीच कमीत कमी विजेचा वापर कसा करावा, पाण्याची बचत कशी करावी आणि प्लास्टिकचा वापर कसा टाळावा याचे मार्गदर्शन केले तरच आपल्या धरणीमातेचे रक्षण होईल आणि धरणीमाता स्वच्छ व हिरवीगार होईल, न होऊन येत्या दहावीस वर्षात मोठ्या समस्येला आपल्याला तोंड द्यावे लागणार आहे’ असे विचार गोव्याचे वन विकास अधिकारी श्री. विशाल सुर्वे यांनी बोलताना व्यक्त केले.

येथील मुक्तांगण विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. त्याप्रसंगी पालक आणि विद्यार्थ्यांना अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखे विचार त्यांनी व्यक्त केले. रामनाथ मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या या स्नेहसंमेलनप्रसंगी अध्यक्षस्थानी मुक्तांगण विद्यालयाचे अध्यक्ष श्री. एल. गुरव हे होते. तर व्यासपीठावर व्हाईस चेअरमन एस. एम. जाधव, सेक्रेटरी दिगंबर राऊळ, जॉइंट सेक्रेटरी बी. एल. सायनेकर, खजिनदार नेमिनाथ कंग्राळकर आणि एन. आर. सनदी व शाळेच्या प्राचार्य जे. के. सविता आदी उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर पाहुण्यांचा सन्मान अध्यक्ष व प्राचार्यांनी केला. वार्षिक अहवालाचे वाचन ज्योती बिजगर्णी यांनी केले. विविध स्पर्धेतील विजेत्यांना पाहुण्यांचे हस्ते रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. “अगदी थोड्या विद्यार्थ्यांसह आणि गोरगरिबांना मदत करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या शाळेला आदर्श सोसायटीचे भरघोस सहकार्य मिळाले असून आता एक हजार विद्यार्थी आहेत तसेच शाळा लवकरच स्वतःच्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहे” अशी माहिती अध्यक्ष श्री. गुरव यांनी आपल्या भाषणात दिली.
भरगच्च अशा सांस्कृतिक कार्यक्रमांनंतर संमेलनाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पा जांबोटकर व देवश्री राऊत यांनी केले. रसिका उचगावकर यांनी आभार मानले. संस्थेचे संचालक शिक्षक, शिक्षिका, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Belgaum Varta Belgaum Varta