
बेळगाव : हॉकी इंडिया आणि हॉकी कर्नाटकशी संलग्न असलेल्या हॉकी बेळगांव संघटनेतर्फे आयोजित मुला-मुलींच्या भव्य आंतरशालेय व आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज सोमवारी नेताजी सुभाषचंद्र बोस (लेले मैदान) टिळकवाडी बेळगांव येथे पार पडला.
स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे नियती फाउंडेशन संस्थापिका डॉ. सोनाली सरनोबत, माजी बुडा अध्यक्ष श्री. शंकरगौडा पाटील, नगरसेवक श्री. आनंद चव्हाण, फेसबुक फ्रेंड सर्कल श्री. संतोष दरेकर, माजी नगरसेवक निळकंठ मास्तमर्डी यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे आणि शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्याचबरोबर आरोग्य आणि स्वच्छता तसेच फिटनेससाठी खेळाडूंनी घ्यावयाचा आहार याविषयी माहिती दिली. आगामी काळात आपण पुन्हा भेट देऊन आरोग्याविषयी आणि खेळाडूंच्या संपूर्ण आहाराविषयी माहिती देणार असल्याचे डॉ. सरनोबत यांनी सांगितले. तसेच नियती फौंडेशनच्या माध्यमातून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर बेळगावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देणार असल्याचेही सांगितले.

सदर स्पर्धा टिळकवाडी येथील नेताजी सुभाष चंद्र बोस (लेले) मैदानावर ही साखळी पद्धतीने खेळविली जाणार आहे.
सदर स्पर्धेत 12 महाविद्यालयीन आणि 9 शालेय अशा एकूण 21 संघांनी भाग घेतला आहे. महाविद्यालयीन आणि शालेय संघांचे प्रत्येकी दोन गट करण्यात आले असून ते पुढील प्रमाणे आहेत. महाविद्यालयीन विभाग ‘अ’ गट : गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स, राणी पार्वतीदेवी कॉलेज, गोविंदराम सक्सेरिया सायन्स कॉलेज, संगोळ्ळी रायण्णा कॉलेज, लिंगराज कॉलेज, पीपल ट्री कॉलेज. ‘ब’ गट : गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स, राणी पार्वतीदेवी कॉलेज, गोविंदराम सक्सेरिया सायन्स कॉलेज, संगोळ्ळी रायण्णा कॉलेज, लिंगराज कॉलेज, बी. के. कॉलेज. शालेय विभाग ‘अ’ गट : एम. आर. भंडारी हायस्कूल, ज्ञानमंदिर हायस्कूल, इस्लामिया हायस्कूल, वाय. एम. शानभाग हायस्कूल. ‘ब’ गट : एम. आर. भंडारी हायस्कूल, जी. जी. चिटणीस हायस्कूल, ज्ञान मंदिर हायस्कूल, सेंट जॉन हायस्कूल काकती, ताराराणी हायस्कूल खानापूर.
सदर स्पर्धेअंतर्गत 12 जानेवारीपर्यंत एकूण 46 हून अधिक हॉकी सामने खेळविले जाणार आहेत.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष हॉकी बेळगाव व माजी बुडा अध्यक्ष श्री. घुळाप्पा बी. होसमनी, उपाध्यक्ष श्री. विनोद पुंडलिक पाटील, महासचिव श्री. सुधाकर चाळके, श्री. उत्तम शिंदे – सेवानिवृत्त उप/ मेजर मानद कॅप्टन, श्री. नामदेव सावंत, राजेंद्र पाटील हे परिश्रम घेत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta