
रायबाग : रायबाग जवळील पालभावी येथील विवाहित महिलेने आपल्या दोन्ही मुलींना पाठीला बांधून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील सुलतानपूर गावच्या हद्दीत सकाळी 11 वाजता सरस्वती नितीन किरवे (वय 26) हिने आपल्या दोन मुली दीपिका (वय 7) आणि रितिका (वय 4) यांच्यासह विहिरीत उडी घेतली.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, 2016 मध्ये रायबाग तालुक्यातील सुलतानपूर गावातील सरस्वती हिचा विवाह सांगली शहरातील नितीन किरवे याच्याशी झाला. या जोडप्याला दोन मुली होत्या. सरस्वती ही सासरच्या जाचाला कंटाळून मागील आठ महिन्यांपासून सुलतानपूर गावात आपल्या घरी मुलींसह राहत होती. पती आणि सासरच्या मंडळींकडून वारंवार होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून सरस्वती यांनी आत्महत्या केल्याचे समजते.
सदर घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta