Friday , October 18 2024
Breaking News

सौंदत्ती डोंगरावर शाकंभरी पोर्णिमा यात्रेची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Spread the love

 

बेळगाव : सालाबादप्रमाणे या वर्षीही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीच्या शाकंभरी पोर्णिमा यात्रेसाठी कर्नाटक महाराष्ट्र गोवा आंध्र प्रदेश तसेच केरळ येथून सलग आठ दिवस भक्तांची प्रचंड गर्दी होणार आहे. यावर्षी तब्बल आठ ते दहा लाख भाविक सौंदत्ती डोंगरावर यात्रा काळात उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गुरुवार दिनांक 25 जानेवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. मात्र सौंदत्ती डोंगरावर रेणुका भक्तांची आत्तापासूनच गर्दी वाढली आहे. यात्रा काळात होणारी प्रचंड गर्दी पाहून मंदिर प्रशासनाच्यावतीने भक्तांच्या सोयीसाठी जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती, मंदिराचे कार्यकारी अधिकारी एस. पी. बी. महेश यांनी दिली आहे.

बेळगाव जिल्हा, कोल्हापूर,सांगली, सातारा, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगनासह केरळ येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुका देवीच्या दर्शनाला वर्षभर भाविकांची गर्दी असते. यामध्ये ही प्रामुख्याने प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी तसेच नवरात्रीला देवी दर्शनासाठी लाखो भाविक दर्शनाला येत असतात. प्रत्येक वर्षी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यातील पौर्णिमाला भरणाऱ्या यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी असते.नवरात्र उत्सव काळातही देवी दर्शनासाठी सौंदत्ती डोंगरावर प्रचंड गर्दी होत असते.

जानेवारी महिन्यातील शाकंभरी पौर्णिमा यात्रेला सौंदत्ती डोंगरावर रेणुका भक्तांची सर्वात मोठी उपस्थिती दिसून येत असते.रेणुका देवीच्या यात्रेला महाराष्ट्र बरोबरच उत्तर कर्नाटकातील रेणुका भक्तही मार्गशीर्ष पौर्णिमा यात्रेला यल्लमा डोंगरावर लाखोंच्या संख्येने देवी दर्शनाला येत असतात. यावर्षी 25 जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे.
शाकंभरी पोर्णिमा यात्रेसाठी मंदिर प्रशासनाने प्रचंड संख्येने येणाऱ्या भाविकांच्या वाढत्या गर्दीची दक्षता घेत विविध उपाययोजना, व्यवस्था आदी कामे हाती घेण्यात येत असतात.
तब्बल आठ ते दहा लाख भाविक देवी दर्शनासाठी डोंगरावर येथील याकडे लक्ष देऊन यात्रेनिमित्त पिण्याचे पाणी, स्वच्छता, पथदीप, पोलीस बंदोबस्त, दर्शन व्यवस्था याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. भाविकांना मंदिराबाहेर देवीचे सुलभ दर्शन व्हावे यासाठी भव्य एलईडी स्क्रीन दोन ठिकाणी बसविण्यात आले आहेत.
40 छोट्या तर पाच मोठ्या टाक्यांच्या आधारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. डोंगरावर विविध ठिकाणी पाण्याचे नळ बसविण्यात आले आहेत. स्वच्छतेसाठी अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सौंदत्ती डोंगरावरील सर्व पथदीपांची दुरुस्ती करण्यात आली आहे. संपूर्ण डोंगरावर प्रकाश व्यवस्था, त्याचबरोबर मोठी गर्दी होणाऱ्या स्नानकुंड, डोंगरावर येण्यासाठी असलेले ३ नाके आणि समाजकंटक आणी चोरट्यांच्या हालचाली टिपण्यासाठी विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
यात्राकाळात डोंगरावर वाहनांची होणारी प्रचंड गर्दी होते, याकडे लक्ष देऊन विविध निर्धारित ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेत यात्रा काळात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात्रा काळात भाविकांना आरोग्य विभागाच्या वतीने वैद्यकीय सेवा ही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक भाविक बैलगाड्या घेऊन यात्रेला येत असतात त्याचीही काळजी घेत जनावरांचा दवाखाना डोंगरावर उभारण्यात आला आहे.
लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना देवीचे दर्शन घेण्यासाठी योग्य त्या प्रकारची काळजी घेत दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येक दिवशी पहाटे चार ते सकाळी साडेसहा व सायंकाळी चार ते साडेसहा या काळात अभिषेक पूजा आरतीसाठी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत असते. याची नोंद घेऊन भाविकांनी सहकार्य करावे.

मंदिर प्रशासनाच्यावतीने यात्रे निमित्त सर्व प्रकारच्या आवश्यकत्या व्यवस्था हाती घेण्यात आल्या आहेत. यात्रा काळात देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भक्तीभावाने आणि शिस्तीने देवी दर्शन घ्यावे.यात्रा भक्ती भावात आणि शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिराचे कार्यकारी अधिकारी एस.पी. बी. महेश यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

वैश्यवाणी समाजातर्फे कोजागिरी पौर्णिमा साजरी

Spread the love  बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैशवाणी समाजातर्फे बुधवारी रामनाथ मंगल कार्यालयात कोजागिरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *