Friday , October 18 2024
Breaking News

जगदीश शेट्टर यांच्या घरवापसीने बेळगावमधील इच्छुकांना धक्का

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या घरवापसीने भाजपच्या गोटात राजकीय चर्चा रंगली आली आहे. पक्षांतर्गत नाराजीमुळे विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा भाजपामध्ये सक्रिय झाले आहेत. त्यामुळे भाजपची ताकद आणखी वाढली आहे. मात्र शेट्टर यांच्या घरवापसीमुळे लोकसभेच्या तिकीट इच्छुकांची उलथापालथ झाल्याचे दिसून येत आहे. आज सकाळपासूनच सोशल मीडियावर भाजपाच्या लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा हायकमांडने रणनीती आखली आहे. लिंगायत समाजाचे प्रबळ नेते म्हणून जगदीश शेट्टर यांना बेळगावमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
बेळगावच्या विद्यमान खासदार मंगला सुरेश अंगडी यांना आगामी तिकीट नाकारल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपाला तगड्या उमेदवाराची गरज असल्याने लोकसभा निवडणुकीत बेळगावमधून जगदीश शेट्टर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचे सूत्रांकडून समजते.
जगदीश शेट्टर आणि मंगला सुरेश अंगडी या जवळचे नातेवाईक असल्यामुळे शेट्टर यांच्या उमेदवारीला मंगला अंगडी यांचा विरोध होणार नाही त्याचप्रमाणे बेळगावचा बालेकिल्ला राखण्यासाठी जगदीश शेट्टर सारख्या तगड्या उमेदवाराची गरज असल्याचे भाजप ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे.
केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकरिता मंगला सुरेश अंगडी या केवळ काही हजारांच्या फरकाने विजयी झाल्या होत्या. त्या या क्षेत्रात सक्रिय नसल्याचाही त्यांच्यावर आरोप होत आहे. आता शेट्टर हे भाजपाचे उमेदवार जाहीर झाल्यास जिल्ह्यात कोणाचाही विरोध राहणार नाही आणि तेच काँग्रेसला जोरदार टक्कर देण्यासाठी योग्य उमेदवार असल्याने त्यांना रिंगणात उतरवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी येडियुरप्पा यांची भेट घेतल्यानंतर शेट्टर यांनी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. भाजपा हायकमांडशी चर्चा झाल्यानंतरच माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी पुन्हा भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे बेळगाव लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी होत असून वरिष्ठांनी देखील या मागणीला सहमती दर्शविल्याची माहिती समोर येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

वैश्यवाणी समाजातर्फे कोजागिरी पौर्णिमा साजरी

Spread the love  बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैशवाणी समाजातर्फे बुधवारी रामनाथ मंगल कार्यालयात कोजागिरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *