बेळगाव : येथील मराठा मंडळ पॉलिटेक्निकच्या १९९३ साली मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवारी संपन्न झाला. तब्बल तीस वर्षांनी पुणे, मुंबई, अहमदाबाद, बेंगलोर, कोल्हापूर व बेळगाव येथून आलेले हे विद्यार्थी एकमेकांना भेटले. प्रथम संपूर्ण कॉलेज परिसर फिरून जुन्या वर्गखोल्या, प्रॅक्टिकल हॉल, लायब्ररीला भेट दिली.त्यानंतर झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात व्यासपीठावर माजी प्रा. के एन पाटील, प्राचार्य सूर्यवंशी, माजी प्राध्यापक पेंडसे, शिंदे, कोवडकर उपस्थित होते. प्रथम माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रमुख गौरी उप्पीन यांनी व्यासपीठावरील तसेच उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. माजी विद्यार्थी मदन बामणे यांनी प्रास्ताविक करताना तीस वर्षांपूर्वीच्या कॉलेज जीवनातील घटनांचा आढावा घेत स्नेहमेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. त्याकाळी विद्यार्थी म्हणून केलेली धमाल आणि मिळालेल्या शिक्षा यावर गोड आठवणींचा लख्ख प्रकाश टाकला.
त्यानंतर उपस्थित सर्वच माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यावेळी आम्ही एक दगड म्हणून या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला त्याची सुंदर मूर्ती आपण घडवून तयार केली आणि म्हणूनच आम्ही स्वतःच्या मालकीच्या कारखान्याचे मालक झालो, अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदावर नोकरी करत आहोत असे सांगून गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन त्यांच्या भावी आयुष्यासाठी आरोग्यपूर्ण शुभेच्छा दिल्या.
व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर गुरुजनांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि बाकरवडी देऊन सन्मानित करण्यात आले.
जे आज आपल्यात नाहीत या गुरुजनांना तसेच कै प्रविण कलागते, श्रीरंग कुलकर्णी, गोपी कोमकालीमठ, प्रविण वागूकर यांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
शेवटी प्राचार्य सूर्यवंशी यांनी बोलताना प्रत्यक्ष जीवनात विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले व भविष्यात पुन्हा पुन्हा येऊन नवनवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येण्याबद्दल विनंती केली.
या क्षणी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जुन्या मैत्रीचा आनंद ओसंडून वाहत होता. तर कॉलेजमध्ये केलेल्या गमतीजमती आणि त्यावेळचे सरांचे ओरडणे या गप्पांनी मन पुन्हा भूतकाळात घेऊन गेले आणि प्रत्येकाचे मन प्रफुल्लित झाले.
त्यानंतर प्राध्यापकांच्या सोबतच बेळगावच्या भाजीभाकरीचा आस्वाद घेण्यात आला.
कॉलेजमधील कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी शंग्रीला रिसॉर्टवर स्वरसंध्या हा जुन्या नव्या हिंदी मराठी कन्नड गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यात अनेक विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात गाणी सादर केली.
रात्रीच्या जेवणानंतर विश्रांती घेऊन दुसरे दिवशी परत वेगवेगळ्या खेळाबरोबरच बोटिंग, रोपरायडिंग, जंगल सफारी, जलतरण तलावात पोहणे अशी मौजमजा करून एकमेकांना पुन्हा भेटण्याचा संकल्प करीत आठवणींचे सोनेरी क्षण मनात साठवून परतीचा प्रवास धरला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनायक लाड, दीपक तरळे, महेश कुदळे, किरण जाधव, आनंद सावंत, राजेश हेब्बाळे व मदन बामणे यांनी विशेष परिश्रम घेतले.