काकासाहेब पाटील : दुसऱ्या कॅन्टीनची मागणी
निपाणी (वार्ता) : निपाणी मतदारसंघात दोन इंदिरा कॅन्टीनला मंजुरी मिळाली आहे. निपाणी शहरासाठी आणखी एका इंदिरा कॅन्टीनची मागणी आपण केली आहे. त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल. त्यामुळे निपाणी व परिसरातील सर्वसामान्य मजूर व नागरिकांची सोय होणार असल्याची माहिती, माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी दिली. रविवारी (ता. ४) सायंकाळी साखरवाडी येथील काँग्रेस कार्यालयात पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
माजी आमदार पाटील म्हणाले, राज्यात मागील वेळी सुरू असणाऱ्या इंदिरा कॅन्टीनची ही योजना २०१८ साली तत्कालीन कुमारस्वामी-भाजप सरकारने रद्द केले होती. मात्र आता राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. सर्वसामान्य मजूर व नागरिकांची अडचण लक्षात घेऊन इंदिरा कॅन्टीन योजनेला पुन्हा सुरुवात केली आहे. त्यामुळे गोरगरीब नागरिकांसह कामगार वर्गाला अल्पदरात या कॅन्टीनच्या माध्यमातून भोजन उपलब्ध होणार आहे.
सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमून त्याप्रमाणे निपाणी मतदारसंघात निपाणी व बोरगाव येथे दोन ठिकाणी या कॅन्टीनला मंजुरी मिळाली आहे. आपण नामदार रामलिंगा रेड्डी व भैरती सुरेश यांची भेट घेऊन निपाणी शहरात दोन स्वतंत्र इंदिरा कॅन्टीनची मागणी केली आहे. मंजुरी मिळालेले एक कॅन्टीन बसस्थानक परिसरात सुरू होणार आहे. यात दुसऱ्या इंदिरा कॅन्टीनला लोकमान्य टिळक उद्यान परिसराची जागा सुचवली आहे. बसस्थानक परिसरात असणारी गरज ओळखून पहिल्या टप्प्यात हे कॅन्टीन सुरु होणार आहे. याशिवाय लोकमान्य टिळक उद्यान परिसर हा मध्यवर्ती व रहदारीचा आहे. त्यामुळे या ठिकाणीही कॅन्टीन झाल्यास त्याचा लाभ नागरिकांना होणार आहे.
राज्य सरकारने राज्यभरात आत्तापर्यंत ४६ ठिकाणी कॅन्टीनला मंजुरी दिली असल्याचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी सांगितले. यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.