
बेळगाव : हळदीकुंकू, तिळगुळ समारंभ यासारख्या कार्यक्रमातून महिला वर्ग एकत्र येतो त्यात विचारांची देवाण-घेवाण होते. अनेक प्रश्नांवर हितगुज होते. जुन्या चालीरीतींना उजाळा मिळतो. यासाठीच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी 150 वर्षांपूर्वी असे कार्यक्रम राबविले होते. पूर्वीच्या काळी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या स्त्रिया शिक्षित होत्या. त्या बंदीवानच होत्या. या स्त्रीला शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून तिला एकीकडे करतेपणाचा दर्जा दिला तर एकीकडे कमविण्याचा अधिकार पण मिळाला. राजकारण, क्रीडाक्षेत्र, विज्ञान आणि अनेक क्षेत्रात आज स्त्रिया चमकु लागले आहेत. त्या धाडसाने उभ्या तर आहेतच पण त्याबरोबर संसारही नेटका करत आहेत. संसारातील पदे त्या व्यवस्थित भूषवत आहेत. अनेक स्त्रिया शिक्षण नसताना देखील विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने गाजत आहेत. हे सगळे लक्षात घेऊन पालकांनी चांगल्या पद्धतीने आपले पालकत्व निभवावे अशा प्रकारचा सल्ला श्रीमती माया पाटील यांनी आज पार पडलेल्या तिळगुळ समारंभात दिला.
कंग्राळ गल्ली येथील जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या समारंभात त्या बोलत होत्या. समारंभाचे अध्यक्ष स्थानी मंडळाचे अध्यक्ष सौ. चंद्रभागा सांबरेकर या होत्या. समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर सौ. रेशमा पाटील, माजी महापौर सौ. संज्योत बांदेकर, उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले. गल्लीतील मंडळाच्या सदस्या डॉक्टर स्वाती खंडागळे, मेघना सांबरेकर, अश्विनी शंभूचे, चिदंबरी शेट्टी, योजना शंभूचे, ज्योती सुतार, आदिती पवार यांनी स्वागत गीत व इशस्तवन म्हटले. यानंतर श्रीमती अंजना शंभूचे, रेणुका कोकितकर, चंद्रभागा सांबरेकर व नीलम बडवानाचे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी महापौर शोभा सोमनाचे, माजी महापौर संज्योत बांदेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास गल्लीतील पंचमंडळी नागरीक, मंडळाच्या सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुनिता शंभूचे यांनी आभार प्रदर्शन केले तर ज्योती सुतार यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यानंतर उपस्थित महिलांना हळदीकुंकू तिळगुळ आणि वाण यांचे वाटप करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta