
बेळगाव : विणकामाच्या क्षेत्रात नित्य नवीन प्रयोग करणाऱ्या आशा पत्रावळी यांनी जापनीज विणकाम पद्धतीचा वापर करून वेगवेगळ्या १६६ लोकरीच्या वस्तू तयार केल्या असून त्याची दखल इनक्रेडीबल बुक ऑफ रेकॉर्डस्ने घेतली आहे. जापनीज विणकाम पद्धतीचा वापर करून त्यांनी तीन महिने ते तीन वर्षांपर्यंतच्या बाळासाठी विविध प्रकारची आकर्षक रंगांची खेळणी, शाल आदी वस्तू तयार केल्या आहेत. विविधरंगी लोकरीच्या या वस्तू लहान मुलांच्या बरोबरच मोठ्यांनाही भुरळ पाडतात. इनक्रेडीबल बुक ऑफ रेकॉर्डस्ने याचे प्रमाणपत्र आणि ट्रॉफी आशा पत्रावळी यांना दिली आहे.

गेल्या पस्तीस वर्षांहून अधिक काळ लोकरीचे विणकाम करत असलेल्या बेळगावच्या आशा पत्रावळी यांनी आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केलेले आहे. दररोज काही तरी नवीन प्रयोग विणकाम करण्यात करायचा असा त्यांचा शिरस्ता आहे.
केवळ दहावी पर्यंत शिक्षण झालेल्या आशा पत्रावळी यांनी विणकाम या विषयावर सहा पुस्तके लिहिली आहेत हे कौतुकास्पद आहे. वेगवेगळे पक्षी, फुले, कार्टूनची विविध पात्रे, फळे अशा विविध प्रकारच्या वस्तू लोकरीचे विणकाम करून आशाताईंनी तयार केल्या आहेत. कोणत्याही प्रकारचे फक्त डिझाईन पाहिले की त्यावरून ते डिझाईन वापरून लोकरीचे स्वेटर तयार करण्याचे कौशल्य त्यांनी विकसित केले आहे. रशियन पॅटर्नचे स्वेटर केवळ चित्र पाहून त्यांनी तयार केली आहेत. याशिवाय लहान मुलांचे विविध प्रकारचे सॉक्स, टोप्या, स्वेटर त्यांनी तयार करून प्रदर्शन देखील भरवले आहे. बेळगाव, गोवा, कोल्हापूर येथे त्यांची लोकरीच्या वस्तूंची प्रदर्शने भरवली आहेत. अनेक शाळा आणि कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना लोकरीच्या विणकाम माचे प्रशिक्षण देवून त्यांना शिकताना अर्थार्जन करण्यासाठी मदत केली आहे. अनेक गरीब महिलांना विणकाम प्रशिक्षण देवून त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यास मदत केली आहे. अनेक संस्थांनी त्यांच्या कार्याची दखल घेवून पुरस्कार देवून गौरवलं आहे. दक्षिण महाराष्ट्र जैन सभेने देखील त्यांना पुरस्कार देवून गौरवलं आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डससह अनेकांनी त्यांची दखल घेतली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta