
बेळगाव : अतिवाड (ता. बेळगाव) येथे व्यायाम शाळेचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला. बेळगावच्या खासदार मंगला अंगडी व राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांच्या प्रत्येकी ५ लाख अनुदानातून एकूण १० लाख निधीतून ही व्यायाम शाळा उभारली आहे. तसेच कार्यकर्ते व दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून ४ लाख रुपयेचे व्यायामशाळेचे साहित्यसुद्धा आणण्यात आले आहे.
७५० चौरस फुटांच्या अत्याधूनिक सुसज्जित अश्या भव्य व्यायाम शाळेचे इरण्णा कडाडी व मंगला अंगडी यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अतिवाडच्या शाखेच्या वतीने भव्य स्वागत सभा घेण्यात आली. खासदार मंगला अंगडी व राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना इरण्णा कडाडी म्हणाले, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. लोकांच्या इच्छेनुसार विकासाची कामे व्हावीत म्हणून आम्ही फंड देत असतो पण त्या परिसरातील कार्यकर्ते व जनता संबंधित प्रकल्प व्यवस्थित व्हावा यासाठी पाठपुरावा केला जात नाही. पण याला अतिवाड गाव अपवाद असून धनंजय जाधव व यतेश हेब्बाळकर यांनी अतिशय कमी वेळेमध्ये भव्य अशी व्यायामशाळा निर्माण केली आहे. असा लोकार्पण सोहळा आम्ही कधी पाहिला नाही. आम्ही सतत तुमच्या पाठीशी आहोत असे ते म्हणाले.
याप्रसंगी खासदार मंगला अंगडी म्हणाल्या की, तरुणांना व्यायामाची गरज असून आम्ही दिलेल्या अनुदानाचा योग्य उपयोग होताना दिसत आहे. तरुणांनी निर्व्यसनी राहून आपले आरोग्य जपावे असे त्या म्हणाल्या.
यानंतर भाजप बेळगांव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले की, अतिवाड गावामध्ये यतेश हेब्बाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या व्यायामशाळेच्या निर्मितीसाठी अतिशय कष्ट घेतले आहेत. कार्यकर्ते समाजासाठी गावांसाठी हिंदुत्वासाठी मी काय करू शकतो असा विचार करून आपला वेळ देऊन पदरमोड करून जमेल तिथका आर्थिक खर्च करून तळमळीनं समाज उपयोगी कामे केली जातात त्यामुळे अश्या भव्य व्यायाम शाळा व कार्ये यशस्वी होत असतात.
याप्रसंगी आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर प्रशांत खन्नूकर, प्रताप कालकुंद्रीकर व प्रसाद बाचीकर यांनी प्रात्यक्षिके सादर केली.
यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत अध्यक्षा छब्बुबाई कांबळ, मुंबईहून खास उपस्थित असलेले उद्योजक योगेश हेळकर, मुंबई येथील शिवसेना शाखा क्र. १४३ चे प्रमुख सचिन नाचनकर, लखन गुरुजी, सतीश निलजकर, प्रदीप पाटील, नगरसेवक राजू भातकांडे, नगरसेवक शंकर पाटील, रामलिंग पाटील, दयानंद भोगण, अजित जाधव, नागनाथ जाधव, गावडू पाटील, आनंद पाटील, यल्लापा बेळगांवकर, मारुती हेब्बाळकर, गोपाळ कामेवाडी, हणमंत पाटील, सुरेश पाटील, अनिल पाटील, निवृत्त सैनिक अर्जुन बेळगावकर, बेक्कीनकेरी ग्राम पंचायत सर्व सदस्य आणि ग्राम पंचायत पीडिओ स्मिता चंदरगी, गावातील वडील मंडळी व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta