
बेळगाव : बेकिनकेरे येथील ज्ञानेश्वरनगर शेजारील नागनाथ मंदिराच्या परिसरात असलेल्या तलावात एक महिला मृतावस्थेत सोमवारी सकाळी आढळून आली आहे. 55 वर्षीय सुनीता रवळू भडांगे असे मृत महिलेचे नाव आहे. सदर महिलेला नेहमी फिट्स येत होते. मात्र तलावात मृतदेह आढळल्याने याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू आहे. ज्ञानेश्वरनगर येथे रवळू भडांगे आणि त्यांची पत्नी सुनीता रवळू भडांगे हे दोघे राहत होते. त्यांचे दोन चिरंजीव भारतीय सेनेमध्ये कार्यरत आहेत. दोघे पती-पत्नी घरी होते.
सुनीता भडांगे या रविवारी रात्रीपासून गायब असल्याचे सांगण्यात येते. सुनीता मृतावस्थेत आढळलेल्या तलावात अवघे गुडघाभर पाणी आहे. सुनीताचे माहेर चंदगड तालुक्यातील कवळीकट्टी असून रविवारी त्या आपल्या माहेरी जाण्यासाठी गावातील बसस्थानकावर आल्याचेही काही महिलांकडून सांगण्यात येत होते. तसेच तिला फिट्स येऊन अनेकवेळा बेशुद्ध पडल्याचेही सांगण्यात येते.
भडांगे यांचा एक मुलगा आणि सून सोमवारी सकाळी बेकिनकेरे गावामध्ये दाखल झाले. सदर घटनेचा पंचनामा काकती पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बेकिनकेरे गावामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta