
येळ्ळूर : येळ्ळूर येथील हिंदवी स्वराज्य युवक संघ व येळ्ळूर ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराजांची पंचधातूची 13 फुटी अश्वारूढ शिवमूर्ती येळ्ळूर येथील महाराष्ट्र चौकामध्ये उभारण्यात येणार आहे, अश्वारुढ शिवमुर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा रविवार (ता. 25) रोजी महाराष्ट्र चौकामध्ये होणार आहे, तत्पूर्वी रविवार (ता. 18) रोजी सकाळी आठ वाजता मूर्ती जे.जे पाटील आर्ट्स अनगोळ येथून अश्वारूढ शिवमुर्ती शिवाजी महाराज उद्यान शहापूर येथे आणण्यात येणार आहे, शिवाजी महाराज उद्यान येथून सकाळी दहा वाजता व वाद्यासह मिरवणुकीला सुरुवात होणार आहे, तेथून मिरवणूक सराफ कट्टा, शहापूर, नाथ पै चौक, वडगाव मार्गे, येळ्ळूरला पोहोचणार आहे. त्यानंतर सोमवार (ता. 19) रोजी सकाळी आठ वाजता पुन्हा मिरवणुकीला सुरुवात होणार असून, येळ्ळूर येथील छत्रपती शिवाजी रोड मार्गे, परमेश्वर नगर,व सिद्धेश्वरनगर पर्यंत काढण्यात येणार आहे. त्यानंतर रविवार (ता. 25) रोजी विधीवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. यावेळी हिंदवी स्वराज संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 25 रोजी दुपारी महाप्रसादाचे आयोजन, तसेच सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ही करण्यात आले आहे. गावामध्ये अश्वारूढ शिवमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेमुळे येळ्ळूरवासियांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावामध्ये शिवमूर्तीची प्रतिष्ठापना व्हावी अशी, अनेक नागरिकांची इच्छा होती. त्यांची इच्छापूर्ती होणार आहे त्यामुळे येळ्ळूर गावामध्ये आनंदी वातावरण आहे
Belgaum Varta Belgaum Varta