Sunday , September 8 2024
Breaking News

शांताई वृद्धाश्रमाच्या आजी-आजोबांची मुंबई दर्शनाची हवाई सफर

Spread the love

 

बेळगाव : आपल्या कुटुंबीयांपासून दुरावलेल्या आणि शांताई वृद्धाश्रमात आपले जीवन व्यतीत करत असलेल्या 40 आजी-आजोबांना हवाई मार्गाने मुंबई दर्शनाची आगळी वेगळी संस्मरणीय संधी प्राप्त झाली आहे. दिनांक 22 ते 26 दरम्यान शांताई वृद्धाश्रमातील आजी- आजोबांच्या मुंबई दर्शनाची सुसज्ज व्यवस्था करण्यात आल्याची माहिती, शांताई वृद्धाश्रमाचे कार्यवाहक आणि बेळगावचे माजी महापौर विजय मोरे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना विजय मोरे पुढे म्हणाले, गेली 30 वर्ष शांताई वृद्धाश्रमाचे काम शासकीय अनुदानाविना दानी व्यक्तींच्या सहकार्यातून केले जात आहे. मुंबईचे उद्योजक अनिल जैन यांनी शांताई वृद्धाश्रमाला भेट दिली. तेथील कामाने प्रभावी झालेल्या अनिल जैन यांनी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना मुंबई दर्शनासाठी आमंत्रित केले. यासाठी अनिल जैन यांनी 22 ते 26 फेब्रुवारी दरम्यान मुंबई दर्शनाची संपूर्ण व्यवस्था ही केली. अनिल जैन यांच्या नियोजनाने प्रभावित झालेल्या शांताई वृद्धाश्रमाचे संचालक आणि पत्रकार राजू गवळी, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे व माजी महापौर आप्पासाहेब पुजारी यांनी बेळगावचे व्यापारी निलेश बागे यांच्याशी संपर्क साधून मुंबईला जाणाऱ्या आजी-आजोबांना हवाई सफर करण्यासाठी प्रयत्न केले. या कामी स्टार एअरचे मालक संजय घोडावत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संजय घोडावत यांनी स्टार एयरद्वारे बेळगाव ते मुंबई आणि मुंबई ते बेळगाव या दोन्ही बाजूच्या आजी-आजोबांच्या विमान प्रवासाची सोय करून दिली.
22 ते 26 फेब्रुवारी दरम्यानच्या मुंबई दर्शनादरम्यान शांताई वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना पहिल्या दिवशी हॉटेल ताजमध्ये हायटी आणि विश्रांतीची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर सहा दिवस गोएंका भवन येथे निवासाची सोय करण्यात आली आहे. या सहा दिवसात वृद्धाश्रमातील आजी आजोबा, जुहूच्या इस्कॉन टेम्पल व चौपाटी, सी-लिंक, सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, गिरगाव चौपाटी, विधान भवन, नरिमन पॉईंट, गेटवे ऑफ इंडिया, समुद्रात बोटिंग, राणीची बाग, बीकेसी टूर, फौंटन ऑफ जॉय शो, विलेपार्ले मार्केट, रेड कार्पेट वॅक्स म्युझियम आणि आर सिटी मॉल आदी ठिकाणी भेट देणार आहेत. याचबरोबर 25 तारखेला सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम व ओंकार भोजने यांच्या ‘करून गेलो गाव’ नाट्यप्रयोगाला हजर राहणार आहेत.
22 तारखेला दुपारी साडेतीन वाजता आजी आजोबांचे सांबरा विमानतळावरून मुंबईकडे प्रस्थान होणार आहे. तर 26 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता मुंबई विमानतळावरून बेळगावकडे प्रस्थान होणार आहे. वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना अशा प्रकारची आगळीवेगळी सफर जीवनातील एक वेगळीच पर्वणी ठरणार आहे, असेही विजय मोरे यांनी यावेळी नमूद केले. याप्रसंगी दिलीप कुरुंदवाडे, राजू गवळी, संतोष ममदापूर, वसंत बालीगा, ऐलन मोरे आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

विनायक नगर येथे दुचाकी जाळण्याचा प्रकार

Spread the love  बेळगाव : विनायक नगर येथे सोमवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास घरासमोर लावण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *