बेळगाव : दरवर्षीप्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला उद्या मंगळवार दि. 20 फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. उद्या सकाळी 6 ते 7 या वेळेत सनईचौघडा व काकड आरतीने उत्सवाला सुरुवात होणार असून दुपारी 12 वाजेपर्यंत कुंकुमार्चन होणार आहे. सकाळी अकरा वाजता श्री समादेवी मंगल कार्यालयात श्रीदेवी दरबाराचे उद्घाटन होणार असून यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून श्री सरस्वती वाचनालय शहापूर अध्यक्ष सौ. स्वरूपा इनामदार उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी 2 ते 3 या वेळेत प.पु.श्री कलावती माता यांचे भजन, दुपारी 3 ते 4 या वेळेत विवेकानंद भजनी मंडळ यांचे भजन, संध्याकाळी 4 ते 5 या वेळेत यमन्नका भजनी मंडळ यांचे भजन संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत श्री श्री श्री वामनाश्रम स्वामी यांचा सत्संग तर 6 ते 7 या वेळेत गजानन महाराज भजनी मंडळ यांचे भजन होणार आहे. शुक्रवार दि. 23 फेब्रुवारी पर्यंत चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी समाज बांधव भगिनी तसेच भक्त मंडळींनी सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवावी असे वैश्यवाणी समाज अध्यक्ष दत्ता कणबर्गी, सचिव अमित कुडतुरकर, महिला मंडळ अध्यक्ष अंजली किनारी व सेक्रेटरी वैशाली पालकर यांनी कळविले आहे.
पाककृती स्पर्धेला उदंड प्रतिसाद
श्री समादेवी जन्मोत्सवाचे औचित्य साधून रविवार दिनांक 18 रोजी समाजातील महिला व युवतींसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत 38 हून अधिक महिलांनी भाग घेऊन उदंड प्रतिसाद दिला. तांदळाच्या पिठापासून गोड किंवा तिखट पदार्थ बनविण्याच्या स्पर्धा 34 वर्षाखालील व 34 वर्षावरील अशा दोन गटात घेण्यात आली. या स्पर्धेत 60 वर्षावरील महिलांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. या पाककला स्पर्धेला परीक्षक म्हणून रुपांजली भोसले यांनी काम पाहिले. उत्सव काळात विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी विविध स्पर्धा घेण्यात येणार असून मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 ते 8.30 या वेळेत एल के जी पहिली व दुसरी विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा, इयत्ता चौथी व पाचवी विद्यार्थ्यांसाठी श्लोक पठण स्पर्धा, इयत्ता सहावी सातवी व आठवी विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा, इयत्ता नववी दहावी पियूसी प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांसाठी प्राचीन किंवा अर्वाचीन भारतीय शोध आणि संशोधक या विषयावर भाषण स्पर्धा घेण्यात येणार आहे.