येळ्ळूर : हिंदवी स्वराज्य युवा संघटना व येळ्ळूर ग्रामस्थांच्या सहकार्यातून येळ्ळूर गावच्या मधोमध असलेल्या महाराष्ट्र चौकामध्ये अश्वारूढ शिवपुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र चौक येळ्ळूर येथे उद्या रविवार (ता. 25) रोजी सकाळी सकाळी 10:00 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात होणार आहे. हा लोकार्पण सोहळा कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर या असणार आहेत. शिवरायांच्या अश्वारूढ मूर्तीचे उद्घाटन युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते होणार आहे, तर या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून कोल्हापूरचे इतिहास संशोधक व अभ्यासक डॉ. अमर अडके हे उपस्थित राहणार आहेत. गावातील विविध सहकारी संस्थांच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन होणार आहे. तसेच या कार्यक्रमाला अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमानंतर दुपारी महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी 8:00 वाजता राधानगरी महाराष्ट्र येथील मराठमोळ्या लोकसंस्कृतीचा इतिहास दाखवणारा “गीतराधाई उत्सवशाही’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. तेव्हा या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.