बेळगाव : डाव व प्रतिडावांनी रंगलेली प्रथम क्रमांकाची कुस्ती निर्धारित वेळेत निकाली न झाल्याने गुणावर झालेल्या लढतीत सेनादलाच्या संग्राम पाटीलने पहिल्या मिनिटातच राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या दिल्लीच्या उदयकुमारवर विजय मिळवून हजारो कुस्ती शौकिनांची वाहवा मिळवली.
आनंदवाडी कुस्ती आखाड्यात ६० हून अधिक चटपटीत कुस्त्या झाल्या. मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे रामचंद्र व शांता टक्केकर यांच्या स्मरणार्थ झालेल्या या आखाड्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर, माजी आमदार परशुराम नंदिहळ्ळी, मारुती घाडी व अंजली पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली.
पहिल्या दोन मिनिटात दोन्ही मल्लांनी परस्परांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. संग्रामने झोळी डावावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. याचवेळी उदयकुमारने कलाजंग
टाकून उपस्थितांची वाहवा मिळवली. मात्र, श्वास रोखून धरायला लावणारी कुस्ती निकाली होत नसल्याने अखेर गुणावर झालेल्या कुस्तीत संग्राम विजयी झाला. या कुस्तीत पंच म्हणून कृष्णा पाटील व मारुती घाडी यांनी काम पाहिले.
दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रकाश इंगळगीने एकचाक डावावर केशव भागवतला चितपट केले. तिसरी कुस्ती जागतिक सुवर्णपदक विजेता सोनबा गोंगाणे वि. राष्ट्रीय पदक विजेता परमानंद इंगळगी यांच्यातील लढत बरोबरीत सोडविण्यात आली. लक्ष्मण पवार
यांनी पंच म्हणून काम पाहिले. पवन चिकदिनकोप वि. दयानंद घटप्रभा यांच्यात झालेली चौथ्या क्रमांकाची कुस्ती बरोबरीत
राहिली. पाचव्या कुस्तीत संतोष हारुगिरी जखमी झाल्याने पार्थ पाटीलला विजयी घोषित करण्यात आले. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत यल्लाप्पा निर्वानट्टीने महेश तिर्थकुंडेला सवारी डावावर चीत केले. सातव्या क्रमांकाची कुस्ती अजित गोडगेरी व हणमंत गडीगवाड ही कुस्ती बरोबरीत राहिली. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत बाळू शिंदीकुरबेटने परशराम हरिहरला घीस्सा डावावर पराभूत केले. नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत सचिन शिंदेट्टीने हणमंत घटप्रभाचा हप्ते डावावरती विजय मिळविला. दहाव्या क्रमांकाची कुस्ती सचिन लंगोटी व रुद्राप्पा ही कुस्ती बरोबरीत राहिली.
आकर्षक कुस्तीत रोहित पाटील कंग्राळीने मुत्तूराज धारवाडचा अवघ्या दीड मिनिटात दोन्ही हाताचे हप्ते भरुन मुत्तूराजला चीत करत गदेचा मानकरी ठरला. दुसऱ्या कुस्तीत रुपेश कर्लेने पांडुरंगचा एकचाक डावावरती विजय मिळविला. तिसऱ्या कुस्तीत ओम घाडीने सलील पठाण रणकुंडेचा मोळी डावावरती पराभव केला. चौथ्या कुस्तीत प्रज्वल मच्छेने वेदांत मासेकरवर आतील टांग डावावर चीत केले. इतर कुस्तीत वैष्णव गुरव किणये, ओमकार सांगाव, श्री घाडी धारवाड, तुकाराम डुकरे, भुमीपूत्र चौगुले मुतगा, वैभव अलारवाड, पवन मुतगा, विकास चापगाव, समर्थ डुकरे आदी मल्लांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.

महिलांच्या प्रमुख कुस्तीत ऋतुजा रावळ शहापूर हिने पूर्वा आंबेवाडीचा घीस्सा डावावर पराभव करुन गदेची मानकरी ठरली. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत राजश्री नाईकने कल्याणी आंबोळकरचा एकचाक डावावरती पराभव केला. त्याचप्रमाणे सिद्धी निलजकर कंग्राळी, आदीती कोरे शहापूर, भक्ती गावडा खानापूर, प्रभा शिवणगेकर खादरवाडी, जान्हवी पाटील किणये, मनस्वी जायाण्णाचे मजगाव, शितल सुतार खादरवाडी, आराध्या हलगेकर येळ्ळूर समिक्षा उशिणकर खानापूर, मिथिला बिर्जे अनगोळ यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करुन विजय मिळवला.
आखाड्याचे पंच म्हणून कृष्णा पाटील, बळाराम पाटील, ए. जी. मंथुरगे, सुधीर बिर्जे, शिवाजी पाटील, बस्सू घोडगेरी, पिराजी मुचंडीकर, बबन येळ्ळूर, राजू कडोली, दुंडाप्पा, अतुल शिरोळे आदींनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचन कृष्णा चौगुले राशिवडे, वाय. पी. नाईक, नारायण मुचंडीकर पिरनवाडी यांनी काम पाहिले.
Belgaum Varta Belgaum Varta