बेळगाव : बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांची तडकाफडकी बेंगलोरला बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पोलीस आयुक्त म्हणून डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची नेमणूक करण्यात आली आहे. नूतन पोलीस आयुक्त म्हणून आज शनिवारी सायंकाळी डॉ. बोरलिंगय्या यांनी आपल्या अधिकार पदाची सूत्रे स्वीकारली.
नव्या पोलीस आयुक्तांवर सर्वात मोठी जबाबदारी असणार आहे ती गेल्या काही दिवसांपासून बेळगाव शहरामध्ये गेल्या सुमारे 15 दिवसांपासून बिडलेली जी तणावाची परिस्थिती आहे ती निवडळवणे. गेल्या कांही दिवसांपासून ढासळलेली बेळगावातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्वपदावर आणून सुरळीत करणे हे फार मोठे आव्हान पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांच्यासमोर असणार आहे. डॉ. एम. बी. बोरलिंगय्या हे एक तरुण व तडफदार आयपीएस अधिकारी आहेत. ते मूळचे मंड्या जिल्ह्यातील मंड्डूर तालुक्यातील मल्लनायकहळ्ळी गावचे रहिवासी असून त्यांचा जन्म 1978 साली झाला आहे.
राज्याच्या गुप्तचर -2 विभागाचे पोलीस अधीक्षक असलेल्या डॉ. बोरलिंगय्या यांना नुकतीच बढती देऊन पोलिस महानिरीक्षक पदाचा दर्जा देण्यात आला असून पुढील आदेशापर्यंत त्यांची पोलीस उपमहानिरीक्षक आणि बेळगाव पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. एम. बी. बोरलिंगय्या हे एमबीबीएस पदवीधर असून ते 2008 कर्नाटक बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
त्यांनी आपले एमबीबीएस शिक्षण 2004 साली म्हैसूर मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केले आहे. तसेच तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी नागरी सेवा परीक्षा यशस्वीरित्या पार पाडली आहे. बोरलिंगय्या यांना समाजसेवेमध्ये विशेष रस आहे. वैद्यकीय क्षेत्रातील सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम करण्यास 6 वर्षाचा कालावधी लागणार असल्यामुळे त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देणे पसंत केले आणि त्यात ते यशस्वी झाले.
आज सायंकाळी त्यांनी आपल्याकडील अधिकार पदाची सूत्रे नूतन पोलीस आयुक्त डाॅ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्याकडे सुपूर्द केली.