
संजीवीनी फौंडेशनमधील महिला दिन कार्यक्रमप्रसंगी प्रतिपादन
बेळगाव : वयोवृद्ध असो अथवा वैद्यकीय आव्हाने असणारे रुग्ण असो त्या रुग्णांना त्यांच्या दैनंदिन प्रक्रियेसाठी कुणाच्यातरी आधाराची गरज असते ती गरज तुम्ही होम नर्स म्हणून पूर्ण करीत असता, अशा गरजूंच्या आयुष्यातील आपण देवदूत आहात असे प्रतिपादन आयएमए बेळगावचे अध्यक्ष तसेच कॅन्टोन्मेंट रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र अनगोळ यांनी केले.
बेळगाव शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक किंवा अपंग लोकांच्या निवासी काळजीसाठी २४x७ कार्यरत असलेल्या चाळीसहून अधिक गृह परिचारिकांचा महिलादिनानिमित्त संजीवीनी फौंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ, आयएमएच्या राज्य उपाध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ तसेच सीईओ मदन बामणे, बाळेश उळवी, संस्थेच्या सल्लागार डॉ. सुरेखा पोटे होत्या.
जयश्री ढवली यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
पुष्पा भेंडवाडे हिने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले.
सीईओ मदन बामणे यांच्याहस्ते डॉ. रविंद्र अनगोळ यांचा सविता देगीनाळ यांच्याहस्ते डॉ. राजश्री अनगोळ यांचा तर रेखा बामणे यांच्याहस्ते डॉ. सुरेखा पोटे यांचा शॉल स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक करताना डॉ. देगीनाळ यांनी होम नर्सिसविषयी कृतज्ञता व्यक्त करून बेळगावशहरात प्रथमच संजीवीनी फौंडेशनच्या वतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात सेवाभावी वृत्तीने होमनर्सिंगचे काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येत असल्याचे सांगितले.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते जवळपास चाळीस महिलांचा शाल स्मृतीचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. राजश्री अनगोळ यांनी होमनर्सिस करीत असलेल्या कामाविषयी त्यांचे कौतुक करून या थोरामोठ्यांचे आशीर्वाद नक्कीच तुम्हास मिळतील असे सांगून त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
डॉ. पोटे यावेळी बोलताना म्हणाल्या की, डॉक्टरांनी आपले काम जरी केले तरी त्यापाठीमागे तुम्हा साऱ्यांची साथ असते म्हणूनच आपण कौतुकास पात्र आहात, आजपर्यंत कुणीही आपला सन्मान सत्कार केलेलं आमच्या नजरेत आलं नाही त्यामुळेच संजीवीनीच्या माध्यमातून आम्ही आज तुमचा सत्कार केला असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी बाळेश उळवी यांचे विशेष सहकार्य लाभले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पद्मा औशेकर, सरिता सिद्दी, लक्ष्मी झंडे, पुष्पा भेंडवाडे यांनी परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta