बेळगाव : वॉर्ड क्रमांक 21 बाडीवाले कॉलनी येथे बंद घराच्या खिडकीचे ग्रील कापून चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुदैवाने चोरट्यांच्या हाती मोठा ऐवज लागलेला नाही.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बाडीवाले कॉलनी येथील रहिवासी कांचन तलरेजा व त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. नेमकी हीच संधी साधून चोरट्यानी घराच्या खिडकीचे ग्रील कापून आत प्रवेश केला आणि 5000 रु. रोख रक्कम लंपास केली. तलरेजा कुटुंबीय गावाहून परत आल्यानंतर सदर घटना उघडकीस आली. तात्काळ पोलिसांना घटनास्थळी बोलाविण्यात आले. पोलीस पुढील तपास करीत आहेत. बेळगांव शहरासह उपनगरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. नुकताच पारिजात कॉलनी, भाग्यनगर, अनगोळ येथे मध्यरात्री घरांची टेहळणी करत असताना चोराची छबी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.