Monday , December 23 2024
Breaking News

समिती युवा नेते शुभम शेळके यांची जामीनावर सुटका

Spread the love

 

बेळगाव : काही दिवसांपूर्वी आनंदवाडी कुस्ती आखाड्यात नेपाळी मल्ल देवा थापा यांनी “जय महाराष्ट्र”ची घोषणा दिली होती. त्यावेळी एका उद्योजकाने आततायीपणा करत कर्नाटकात जय महाराष्ट्र म्हणायचे नाही तर “बोलो भारत माता की जय” म्हणा असे वक्तव्य केल्यामुळे बेळगावातील मराठीभाषिकात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांनी प्रसारमाध्यमांवरून आपला निषेध नोंदविला होता. त्यामुळे पोटसुळ उठलेल्या काही कन्नड संघटनांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. त्यानुसार माळमारुती पोलीस स्थानकात शुभम शेळके यांच्यावर भाषिक तेढ निर्माण केल्याचा आरोप करत कलम 110 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली होती. तीन दिवसानंतर शुभम शेळके यांना आज जामीन मंजूर झाला असून त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे.
बेळगांव शहरात शांतता भंग होणार नाही यासाठी खबरदारी म्हणून शुभम शेळके यांना अटक करण्यात आली होती. यासंदर्भात माळमारुती पोलीस स्थानकातील एका पोलीस अधिकाऱ्यानेच शुभम शेळके विरुद्ध तक्रार नोंद केली हाती. याप्रकरणी शुभम शेळके यांच्या जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. पाहिल्यांदाच दोन सरकारी जामीनदारांची मागणी करण्यात आली होती मात्र कायद्यात कोठेच अश्या प्रकारे सरकारी जामीनदार देणे बंधनकारक नसल्याचे वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर दोन उच्चभ्रू जामीनदारांच्या जामीनावर शुभम शेळके यांची मुक्तता करण्यात आली. मात्र वारंवार होणाऱ्या गळचेपी विरोधात जिल्हा सत्र न्यायालयाकडे दाद मागण्यात येणार आहे.

दरम्यान, शुभम शेळके हिंडलगा कारागृहातून बाहेर पडताच त्यांनी हुतात्मा स्मारकात जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्या सोबत बहुसंख्य युवा कार्यकर्ते, समितीप्रेमी, मराठी भाषिक उपस्थित होते. कारागृहातून बाहेर पडताच कार्यकर्त्यांनी युवा नेते शुभम शेळके यांना पुष्पहार घालून जल्लोष केला.

यावेळी ऍड. महेश बिर्जे, ऍड. एम.बी. बोंद्रे, ऍड. बाळासाहेब कागणकर आणि ऍड. वैभव कुट्रे यांनी काम पाहिले.

About Belgaum Varta

Check Also

मराठा बँकेच्या चाव्या सत्ताधारी गटाकडे; एका जागेवर अपक्ष विजयी

Spread the love  बेळगाव : संपूर्ण बेळगाव शहराचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *