
हिंदू-मुस्लीम पंच समिती बैठकीत सूचना
बेळगाव : सध्या रमजान महिना सुरु झाला आहे. याच काळात हिंदू सणही होत आहेत. पुढील आठवड्यात होळी असून ती शांततेत व्हावी यासाठी हिंदू व मुस्लिम पंच समिती सदस्यांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचना पोलिस आयुक्त इडा मार्टिन मार्बानियांग यांनी केली.
येथील जुन्या पोलिस आयुक्तलायच्या समुदाय भवनात बुधवारी (दि. २०) दुपारी १२ च्या सुमारास शहरातील विविध गल्ल्या व उपनगरांमधील मुस्लिम समाजाच्या पंच मंडळींची शांतता समिती बैठक घेण्यात आली. कायदा व सुव्यवस्था शाखेचे डीसीपी रोहन जगदीश, रहदारी व गुन्हे शाखेच्या डीसीपी पी. व्ही. स्नेहा व अन्य अधिकारी व्यासपीठावर होते.

ते पुढे म्हणाले, रमजानचे रोजे सुरु असल्याने मुस्लिम बांधव रात्री उशिरापर्यंत जागे असतात. शिवाय पहाटेही लवकर उठतात. त्यामुळे प्रत्येक गल्ली, मोहल्ला व उपनगरांमध्ये सकाळी व रात्रीच्या टप्प्यात गर्दी असते. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. रहदारीला अडचण निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी केली.
सायंकाळी सहानंतर हिंदू पंच समिती सदस्यांची बैठक याच ठिकाणी झाली. यावेळी होळी व रंगपंचमी सणाबाबत चर्चा झाली. येत्या रविवारी होळी, दुसऱ्या दिवशी रंगपंचमी आहे. याशिवाय बेळगावात वेगवेगळ्या ठिकाणी दोन वेळा रंगपंचमी साजरी केली जाते. या काळात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर पोलिस प्रशासनाची नजर राहील. रंग उडविताना अनोळखी महिला, तरुणी अथवा युवतींवर रंग उडवू नयेत. याची काळजी घ्या. त्या-त्या भागातील पंच मंडळींनीही याबाबत सूचना करण्याचे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले. बैठकीला मार्केट, खडेबाजार व बेळगाव ग्रामीणचे एसीपी, सर्व ठाण्यांचे पोलिस निरीक्षक हिंदू व मुस्लिम समाजाचे पदाधिकारी, पंच कमिटीचे होते.
Belgaum Varta Belgaum Varta