बेळगाव : लोकसभा निवडणुका लागल्या की स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना जणू सुगीचे दिवस येतात. जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसे राष्ट्रीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. याचेच प्रत्यय मागील आठवड्यात एका मराठी भाषिक माजी महापौराने भाजपासाठी राबविलेल्या सह्यांच्या मोहिमेवरून दिसून आले. पण ज्या भाजप नेत्यांसाठी सह्यांची मोहीम राबविली गेली त्या नेत्याला पक्षाने तिकीट नाकारल्याने सह्यांच्या मोहिमेत सहभागी झालेले एक माजी महापौर अपेक्षाभंग झाल्याने काँग्रेसच्या दिमतीला हजर राहिले. ते कमी होते म्हणून की काय बेळगाव दक्षिणमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकमेव नगरसेवक असल्याच्या अविर्भावात वावरणाऱ्या एका विद्यमान नगरसेवकाने तर कालपर्यंत समितीच्या बैठकांतून लोकसभा निवडणुकीत उमेदवार देण्याऐवजी नोटाचा पर्याय सुचविला होता आणि आज मात्र हेच महाशय चक्क काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना आपल्या प्रभागात आणून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी महिलांना मिळणारे गृहलक्ष्मी योजनेतील 2000 रु. या उमेदवाराच्या मातोश्रींच्याच कृपेने मिळतात हे सांगण्यास देखील ते विसरले नाहीत. महिलांवर जशी लक्ष्मीमातेची कृपा झाली तशीच कृपा या महाशयांवर तर झाली नसेल ना? असा प्रश्न स्वाभिमानी मराठी भाषिक जनतेला पडला आहे.
एकीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीचा एक गट लोकसभा निवडणुक लढविण्याबाबत आग्रही आहे. दुसरीकडे एक गट निवडणूका न लढविण्याबाबत ठाम आहे. तर काही निष्ठावंत मराठी भाषिक मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करून केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासंदर्भात आज होणाऱ्या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन कोणता निर्णय घेण्यात येईल याकडे समिती कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.