

भारतात घराणेशाहीचा मुद्दा हा कायमच चर्चेत राहिला आहे. पक्ष कोणताही असो प्रस्थापित नेता आपल्या कुटुंबातील लोकांना पुढे करून पदे लाटण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. पद मिळाले नाही की पक्ष चांगला नाही तर पक्षाला राम राम करून नवीन घरोबा थाटतात. असाच एक घराणेशाहीचा उदय बेळगावमध्ये झाला आहे. सगळी पदे आपल्यालाच मिळावी यासाठी प्रयत्नशील असणारे हे घराणे येणाऱ्या काळात पंचायत सदस्य देखील आपल्याच घरातील कोणाला तरी केले तर नवल वाटू नये. बाहेरून येवून पैशाच्या बळावर बेळगाव ग्रामीणमध्ये आपला बस्ता बसविलेल्या अक्कानी एकदा लोकसभा निवडणूक लढवून पहिली पण त्यात यश आले नाही. कानडी जनतेने त्यांच्याकडे पाठ फिरवली. अक्का एकदा विधानसभा निवडणूक पण लढल्या पण मराठी लोकांच्या ताकदी पुढे त्यांचा निभाव लागला नाही. शेवटी मग मराठी मुलगी म्हणून डोक्यावर फेटा, नाकात नथ घालून अगदी मराठी संस्कृती आणि भाषेशी किती जिव्हाळा आहे हे दाखवत मराठी लोकांना भुलवत एकदाची सत्ता मिळवली. आणि अक्का बेळगाव ग्रामीणमधून निवडून आल्या. चार पैशाच्या अमिषाला बळी पडून मराठी लाचार लोकांनी बाईची चाकरी करण्यासाठी मराठी आईचा सौदा केला आणि त्याच कशा त्यांच्या नेत्या आहेत हे दाखवत गावभर हे कार्यकर्ते मिरवू लागले. समितीच्या जीवावर प्रतिष्ठा मिळवलेले हे लोक समितीत स्थान मिळत नाही, संधी मिळत नाही अशी बोंब मारत अक्काच्या पदराखाली आसरा घेतला. जणू काही तिकडे गेल्यावर यांना मोठी पदे सहज मिळणार असल्याच्या आविर्भावात त्यांनी समितीशी गद्दारी केली. समिती मधील काही लोकांच्या धोरणावर टीका करत असताना मायमराठीच्या लढ्याला देखील त्यांनी केराची टोपली दिली. ज्या मराठीने त्यांना मोठे केले त्याच मराठी भाषेसाठी आणि तिच्या स्वाभिमानासाठी सुरू असलेल्या लढ्याचा त्यांनी अपमान केला. पण शेवटी “जैसी करणी वैसी भरणी” या उक्तीप्रमाणे पैशाच्या नी पदाच्या मोहाने गेलेल्या या कार्यकर्त्यांना पैसा मिळाला असेल कदाचित पण शेवटी पद एकच ते म्हणजे “अक्काचे कार्यकर्ते”.

अक्काने आमदारकी मिळवली सोबत आपल्या भावाला देखील विधान परिषद आमदार केले. आता मुलाचा नंबर आला. त्याला खासदारकीचे तिकीट मिळवून दिले आणि सगळी ताकद पणाला लावली आहे. कदाचित युवराज निवडून देखील येतील पण कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलत राहणार हे नक्की. कारण येणाऱ्या काळातील आणखी काही पदे असतील ते देखील आपल्याच घरातील लोकांना मिळवून देवून सगळी सत्ता घरात आणायला अक्का मागे पुढे विचार करणार नाही हे नक्की.
शेवटी स्वतःच्या घरात गद्दारी करून दुसऱ्या घराची भांडी घासणाऱ्या कार्यकर्त्यांचा कणा कधीच मोडला आहे. स्वाभिमान तर शिल्लक नाहीच पण आता स्वतःची ओळख देखील मिटत चालली आहे आणि परिस्थिती एवढी वाईट झाली आहे या कार्यकर्त्यांची की घरवापासी तरी कोणत्या तोंडाने करणार? पण एक मात्र नक्की “माय मराठी”चे मन खूप मोठे आहे. लेकरांना अंतर देणार नाही.
Belgaum Varta Belgaum Varta