बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांना एकत्रित आणण्यासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांची एप्रिल 30 रोजी बेळगाव येथे सभा होणार आहे. त्याअनुषंगाने शनिवारी बेळगाव जत्तीमठ येथे सकल मराठा समाजाची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी सभा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला असून सीमाभागातील मराठी जनतेने यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रकाश मरगाळे होते.
प्रारंभी ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी आरक्षण मिळाल्यामुळे इतर समाजाची प्रगती झाली आहे मात्र आरक्षणापासून वंचित राहिल्यामुळे मराठा समाजाची प्रगती खुंटली आहे. महाराष्ट्रातील आणि सीमा भागातील मराठा समाजाला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी जरांगे-पाटील गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आंदोलन करीत आहे तसेच त्यांच्या आंदोलनाला यश मिळत आहे. त्यांच्या सभेच्या माध्यमातून सीमाप्रश्न आणि सीमा भागातील इतर विषयांना वाचा फोडण्याचे काम होणार आहे.
माजी आमदार मनोहर किणेकर, रमाकांत कोंडुसकर, मदन बामणे, राजेंद्र मुतगेकर, संजय मोरे आदींनी मनोगत व्यक्त करताना सर्व भागातील मराठा समाजाने एकत्र येऊन सभा यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या घ्याव्यात तसेच सभा होणाऱ्या ठिकाणी आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी आतापासूनच उपाय योजना कराव्यात असे मत व्यक्त केले.
यावेळी ऍड. एम. जी. पाटील, रणजीत चव्हाण-पाटील, आर. एम. चौगुले, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, श्रीकांत – कदम, संतोष कृष्णाचे, आर. आय. पाटील, सागर पाटील, मारुती घाडी, बाळू जाधव, बाबू भडांगे, संजय पाटील, दीपक पावशे, अमित देसाई, विकास कलघटगी, डी. बी. पाटील आदी उपस्थित होते.