बेळगाव (वार्ता) : छत्रपती शिवरायांच्या मुर्तीची बेंगलोर येथे झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ बेळगाव मध्ये निषेध करण्यात आला. मात्र पोलिसांनी त्यामध्ये अनेक तरुणांना नाहक अटक करून हिंडलगा कारागृहात डांबले आहे.
अनेक तरुणांवर राज्यद्रोह सारखा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे बेकायदेशीर असून या तरुणांची तातडीने सुटका करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक आणि माजी महापौर संघटनेच्या वतीने नूतन पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली.
माजी महापौर अॅड. नागेश सातेरी, शिवाजी सुंठकर, एपीएमसीचे माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी नगरसेवक रतन मासेकर आदींच्या शिष्टमंडळाने आज पोलिस आयुक्तांची भेट घेतली.
त्यावेळी घडलेल्या एकंदर प्रकाराबद्दल माहिती देण्यात आली. अनेक मुले अभ्यास करून आपल्या परीक्षा देण्याची तयारी मध्ये होती. कुठल्या आंदोलनांमध्ये त्यांचा सहभाग नव्हता. परंतु कोणताही सारासार विचार न करता पोलिसांनी त्या मुलांना हिंडलगा कारागृहात डांबले आहे. सीए आणि इंजीनियरिंगची परीक्षा देण्याची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना नाहक अडकवल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
पोलिसांनी अटक करून तुरूंगात डांबलेल्या सर्व तरुणांची कोणतीही चूक नव्हती. त्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली. यावेळी पोलिस आयुक्त बोरलिंगय्या यांनी आपण या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊ असे आश्वासन दिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta