
बेळगाव : कर्ले-बेळगुंदी रस्त्यावरील बेळगुंदी स्मशानभूमीजवळ धावत्या दुचाकीवर झाड कोसळून एक तरुण जागीच ठार झाला, तर पाठीमागे बसलेले दोघेजण जखमी झाले आहेत. रविवारी (दि.९) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. सोमनाथ रवळू मुचंडीकर (वय २०, रा. कर्ले) असे मृत तरूणाचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सोमनाथ व त्याचे दोन मित्र कर्लेहून कामानिमित्त बेळगुंदीला जात होते. बेळगुंदी येथील स्मशानभूमीजवळ दोन्ही बाजूला आकाशीची भरपूर झाडे आहेत. यातील एक झाड दुचाकी चालवत असलेल्या सोमनाथच्या अंगावर कोसळले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला तर पाठीमागे बसलेले स्वप्निल सुनील देसाई (वय २१) आणि विठ्ठल कृष्णा तळवार (वय २०) हे दोघे गंभीर जखमी आहेत. जखमींना जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. जखमी पैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta