बेळगाव : बेकायदेशिररित्या गुरांची वाहतूक करणाऱ्या कर्नाटक येथील चाैघांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मालवाहू ट्रक, एक कार आंबोली पोलीसांनी जप्त केली आहे. या धडक कारवाईत पाेलिसांनी एकूण २९ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यानंतर जखमी बैलासह उर्वरीत बैल गोवा राज्यातील करासवाड- शिकेरी येथील गो शाळेत सुखरूप पाठवण्यात आले.
पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार रविवारी सकाळी गुरांनी भरलेला मालवाहू ट्रक सावंतवाडी- आंबोली मार्गे कर्नाटक राज्यात येत होता. या मालवाहू ट्रक समवेत एक कार देखील हाेती. या मालवाहू ट्रकची आंबोली चेक पोस्टला तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल ९ बैल आढळून आले. आंबोली पोलिसांनी अधिक चाैकशी केली असता चालकास समपर्क उत्तर देता आले नाही.
आंबोली पोलिसांनी गो तस्करी करणाऱ्या या दोन्ही गाड्यांसह कर्नाटक येथील चार युवकांना ताब्यात घेतले. महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम २०१५, प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम १९६०, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९ प्रमाणे, मोटार वाहन कायदा कलम-१८४ प्रमाणे या गुन्ह्यातील संशयित आरोपी सैफअली अयुबहुसैन माडीवाले (वय ३० राहणार पिरनवाडी, जिंदतनगर, ता.जि. बेळगाव), अदनान रमजान बेपारी (वय २३ राहणार कसाई गल्ली, कॅम्प, ता.जि. बेळगाव), नविदअलीखान मोहम्मदअलीखान पठाण (वय ३२) राहणार बेळगाव पिरनवाडी, ता.जि. बेळगाव), इसा बहूद्दीन बेपारी (वय २३) राहणार बेळगाव मार्केट इस्टेट, ता.जि. बेळगाव यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.