बेळगाव : येथील हिंदी प्रचार सभा आणि हिंदी मैत्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने “युगांत” कादंबरीतील भीष्म या प्रमुख व्यक्तिरेखेचा परिचय सभिनय असा श्री. माधव कुंटे यांनी सादर केला.
हिंदी प्रचार सभेच्या सभागृहात शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी रतन पाटणकर हे होते. तर व्यासपीठावर युगांत चे लेखक प्रा विनोद गायकवाड, हिंदी अनुवादिका डॉ. प्रतिभा मुदलीयार व किशोर काकडे आणि प्रा. निता दौलतकर उपस्थित होते.
भीष्मा विषयी आपले सखोल चिंतन व्यक्त करताना कुंटे म्हणाले की, आकाशाला गवसणी घालणारी, आणि समग्र जीवनाला कवेत घेणारी भीष्म ही एक महान व्यक्तिरेखा आहे. भिष्म म्हणजे त्याग आणि शौर्याचे आदर्श होते. प्रचंड दुःख आणि अपमान सहन करूनही हा योद्धा जगाला मार्गदर्शन करत जीवनाच्या अखेरपर्यंत ठामपणे उभा राहिला.
प्रा. गायकवाड आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, युगांत प्रसिद्ध होऊन आज पंचवीस वर्षे झाली तरी तिची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. भीष्म हा महानायक आहे. प्रत्येक व्यक्तीकडे थोडाफार भीष्म असतोच. त्याची विराट वेदना ,थोर प्रतिज्ञा, असीम शौर्य, अफाट त्याग, जीवनविषयक तत्वज्ञान यामुळे भीष्म आजही प्रेरक व आदर्श आहे.
कार्यक्रमाची सुरुवात श्रुती सरमळकर यांच्या स्वागत गीताने झाली.श्री बी बी शिंदे यांनी स्वागत केले. डॉ. मुदलीयार यांनी प्रास्ताविक केले. किशोर काकडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. रतन पाटणकरांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. शैला मत्तिकोप यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते डी. एस. मुतकेकर, वैष्णवी डोंगरे आदींनी परिश्रम घेतले.
संपूर्ण कार्यक्रमाचे भारदार सूत्रसंचालन डॉ. निता दौलतकर यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्येने साहित्य रसिकांनी उपस्थिती दर्शवली होती.
Belgaum Varta Belgaum Varta