Monday , December 23 2024
Breaking News

समिती बळकट करण्यासाठी जोमाने कामाला लागा

Spread the love

 

शहर समितीच्या बैठकीत विचारमंथन

बेळगाव : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे खचून न जाता नव्या उमेदीने कार्यकर्त्यांनी कार्य करावे आणि सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केले. ३० जून रोजी झालेल्या शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर महाराष्ट्र समितीचे उपाध्यक्ष बी. ओ. येतोजी होते. यावेळी बोलताना खजिनदार प्रकाश मरगाळे म्हणाले की, सीमा लढ्यासाठी आजवर अनेकांनी आपले आयुष्य वेचले आहे. सीमाप्रश्न सुटावा हा एकच ध्यास मनात ठेवून हा लढा आजवर जिवंत ठेवला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांकडे वेळोवेळी सीमाप्रश्नासंदर्भात पाठपुरावा केला जात आहे. सीमाप्रश्नासंदर्भात ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांना आस्था आहे त्यामुळे वेळोवेळी आपण त्यांच्याकडे जाऊन समस्या मांडत असतो आणि सीमाप्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी करत आहोत. महाराष्ट्रात कोणतेही सरकार असले तरी सीमाप्रश्नासंदर्भात आपण वेळोवेळी त्यांच्याशी पत्रव्यवहार करून कायदेशीर प्रक्रियेला लवकरात लवकर सुरुवात व्हावी यासाठी काही निवृत्त न्यायाधीशांच्या देखील आपण संपर्कात आहोत असे यावेळी बोलताना ते म्हणाले.
मत्तीमठ येथे झालेल्या बैठकीत नवीन स्थापन झालेल्या जम्बो कार्यकारिणीला अनेक कार्यकर्त्यातून विरोध झाला. यावेळी बोलताना समितीचे नेते मदन बामणे म्हणाले की, जे कार्यकर्ते प्रामाणिक आहे त्यांना कार्यकारिणीत स्थान द्यावे, अशी मागणी कार्यकर्त्यातून होत असतानाच सविस्तर चर्चेअंती जम्बो कार्यकारिणीची निर्मिती झाली होती मात्र कार्यकारिणीतील प्रत्येक सदस्य समितीच्या कार्यात सक्रिय राहिला तरच या जम्बो कार्यकारिणीचा समितीला फायदा होणार आहे.
समिती कार्यकर्ते रणजीत हावळान्नाचे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काही समिती कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय पक्षाचे काम केले आहे अशा कार्यकर्त्यांवर आगामी काळात कठोर कारवाई करण्यात यावी.
अमित देसाई म्हणाले की, पराभवाची जबाबदारी कोणी तरी घेणे गरजेचे आहे पण तसे दिसत नाही. उमेदवार निवड कमिटी पूर्णपणे सेटिंग झालेली होती. कमिटीतील सदस्य उघडपणे राष्ट्रीय पक्षाच्या वळचणीला गेले होते. अशा कार्यकर्त्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
लोकसभा निवडणुकीवेळी समिती नेतृत्वाने म्हणावी तशी साथ आपल्याला दिली नसल्याची खंत लोकसभेचे उमेदवार महादेव पाटील यांनी व्यक्त केली. काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय पक्षाचा प्रचार केल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला कार्यकर्त्या शिवानी पाटील यांनी समिती कार्यकर्त्यांकडून नवीन लेटरहेडचा वापर करण्यात येत असल्याची बाब नेत्यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यावर खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी भविष्यात अशा प्रकारच्या लेटरहेडचा वापर न करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.
बैठकीचे अध्यक्ष बी. ओ. येतोजी, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, कार्याध्यक्ष रणजित चव्हाण- पाटील, राजू बिर्जे, रमाकांत कोंडूसकर, सागर पाटील, शुभम शेळके, श्रीकांत कदम, अभिजित मजुकर, उमेश पाटील, मोतेश बार्देशकर, प्रकाश नेसरकर आदींनी मनोगत व्यक्त केले.

बैठकीला युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, शेखर पाटील, माजी नगरसेवक राकेश पलंगे, विकास कलघटगी, बाबू कोले, दत्ता जाधव, चंद्रकांत कोंडुसकर, पियुष हावळ, अनिल अंबरोळे, किरण हुद्दार, धनंजय पाटील, प्रशांत भातकांडे, सचिन केळवेकर, किरण मोदगेकर, मनोहर हुंद्रे यांच्यासह समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कॉंग्रेस सरकार हटवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही : माजी पंतप्रधान देवेगौडांचा इशारा

Spread the love  बंगळूर : राज्यातील कॉंग्रेस सरकार हटवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *