बेळगाव : “मनुष्याच्या जीवनात दोन व्यक्तींना अनन्यसाधारण महत्त्व आहे त्या म्हणजे शिक्षक आणि डॉक्टर, शिक्षक हा माणसाला घडवतो तर डॉक्टर हा माणसाला वाचवतो, त्यामुळे डॉक्टर हा पृथ्वीवरचा देवच आहे, त्याने फक्त सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून काम करावे” असे आवाहन प्रा. संध्या देशपांडे यांनी बोलताना केले.
येथील जायन्ट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनच्या वतीने एक जुलै रोजी सायंकाळी शहरातील सहा डॉक्टर्सना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संध्या देशपांडे उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी जायन्ट्सचे अध्यक्ष अविनाश पाटील हे होते.
शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केल्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय डॉ. विनोद गायकवाड यांनी दिला. तर मनोज तोगले, आप्पासाहेब कोणे, हेमंत भोईटे, विनायक भोसले, अनिल संतीबस्तवाड, संदीप आणि सुरेश नेगिनहाळ या सहा डॉक्टरचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना मनोज चौगुले यांनी “जनतेने आपले आरोग्य सांभाळण्यासाठी नियमित व्यायाम, योगा व संतुलित आहार घेतला तर कोणालाही डॉक्टरकडे जावे लागणार नाही असे ते म्हणाले. याप्रसंगी डॉक्टर आप्पासाहेब कोणे यांनीही आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतानंतर आभार प्रदर्शन होवून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास जायन्ट्सचे विभागीय संचालक अनंत लाड, शिवकुमार हिरेमठ, सचिव यल्लाप्पा पाटील यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन खजिनदार अनिल चौगुले यांनी केले.