बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मोदगा गावातील श्री मारुती मंदिराची सुमारे २०० कोटी रुपयांची ९३ एकर जमीन बळकावणाऱ्या बेळगावच्या माजी जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा तीव्र लढा देऊ, असा इशारा श्री राम सेना प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी दिला आहे.
आज बेळगाव शहरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कर्नाटक राज्यात याआधीच अनुसूचित जाती-जमाती विकास महामंडळ, वाल्मिकी महामंडळ, मुडा घोटाळे उघडकीस आले आहेत. तर दुसरीकडे बेळगाव तालुक्यातील मोदगा गावातील श्री मारुती मंदिराच्या मालकीच्या सुमारे २०० कोटी किमतीच्या ९३ एकर जमिनीवर अतिक्रमण होत आहे. बेळगावच्या माजी जिल्हाधिकाऱ्यांनी एका गैर-धार्मिक रिअल इस्टेट व्यावसायिकाला मंदिराची मालमत्ता हडप करण्यास सक्षम केल्याचा आरोप केला असून संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. ज्यांच्याकडून जनता न्यायाची अपेक्षा करते अशा लोकांनीच कुंपणच शेत खाल्ल्याप्रमाणे वर्तन केले आहे. मोदगा ग्रामस्थांची फसवणूक करण्यात आली असून या जागेबाबत ६० वर्षांच्या नोंदीही गावकऱ्यांकडे आहेत. मुजराई विभागानेही ही मालमत्ता आपल्या अधिकाराची असल्याचे सांगितले. मात्र, रिअल इस्टेट उद्योगाला अनुकूल करण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करण्यात आला आहे. सध्या अनेक अधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्या आहेत. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करावे लागेल. असा इशारा त्यांनी दिला. पत्रकार परिषदेत श्रीराम सेना बेळगावचे नेते रविकुमार कोकीतकर, ओमन्ना अष्टेकर मुगळी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta