बेळगाव : गेल्या २२ वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शनैश्वर एज्युकेशनल अँड सोशल वेल्फेअर सोसायटीचे कार्य आदर्शवत आहे. संस्थेने गरजूंना वैद्यकीय मदत करण्यासाठी घेतलेल्या भूमिकेला तोड नाही. यासाठी आवश्यक ते सहकार्य करु, असे आश्वासन अरिहंत हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक व हृदयरोगतज्ञ डॉ. माधव दीक्षित यांनी केले.
शनैश्वर एज्युकेशनल अँड सोशल वेल्फेअर सोसायटीने नऊ लाख रुपये खर्चुन आणलेल्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण रविवारी (दि. २८) शनी मंदिराजवळील एका सभागृहात झाले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. उद्योजक सुनील नाईक, नगरसेविका पूजा पाटील, वैशाली भातकांडे, केएलई ब्लड बँकेचे मुख्य संयोजक श्रीकांत विरगी प्रमुख पाहुणे होते.
मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवराय व जगद्गुरू बसवेश्वर यांच्या पुतळ्यांचे पूजन करण्यात आले. दिवंगत संचालक गजानन पोटे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. अनिल चौधरी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सोसायटीच्या पाटील मळ्यातील जागेत प्रशस्त इमारत बांधण्यासाठी देणगीदारांनी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. मोफत ऑक्सिजन सिलिंडर, कॉट, वॉकर व अन्य वैद्यकिय साहित्याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. नाईक यांनीही सोसायटीच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी संस्थेचे संचालक संजय भावी, गजानन पाटील, शिवाप्पा इटगी, महांतेश देसाई, अनिल धामणेकर, शिवराज पाटील, श्रीकांत देसाई, संजय शहा, विकास कलघटगी, बापूसाहेब देसाई, ईश्वर लगाडे, शंकर काळे, शिवाजी हंगिरकर, व्यंकटेश कुलकर्णी, महादेव चौगुले, नारायण किटवाडकर आदी उपस्थित होते. गजानन पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta