Tuesday , September 17 2024
Breaking News

विकसित भारताचे स्वप्न साकार करणे तरुण पिढीला शक्य : बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर

Spread the love

 

बेळगाव : “2047 साली ज्यावेळी आपला देश स्वातंत्र्याची शंभर वर्षे साजरी करत असेल त्यावेळी तो विकसित भारत म्हणून गणला जाईल. हे आपल्या पंतप्रधानांचे स्वप्न साकार करायचे असेल तर त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे. आपल्या देशातील तरुण पिढीला ते शक्य आहे” असे विचार बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी बोलताना व्यक्त केले.
येथील एसकेई सोसायटीच्या राणी पार्वती देवी महाविद्यालय व जीएसएस महाविद्यालय या संस्थांना मिळालेल्या स्वायत्तता दर्जाची सुरुवात सोमवारी सकाळी समारंभपूर्वक झाली. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बिहारचे राज्यपाल श्री. राजेंद्र आर्लेकर हे उपस्थित होते तर राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू सी. एम. त्यागराज व कुलसचिव राजश्री जैनापुर हेही पाहुणे म्हणून उपस्थित होते.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉ. किरण ठाकूर व व्यासपीठावर संस्थेचे सेक्रेटरी राजीव देशपांडे हे होते.
“शिक्षण क्षेत्रात उत्तम गुण मिळवलेल्या स्कॉलर विद्यार्थ्यांची देशाप्रती असलेली जबाबदारी मोठी आहे. मात्र ते समाजाच्या विकासामध्ये सहभाग होत नाहीत. याबद्दलची खंत व्यक्त करून पार्लेकर म्हणाले की,” या देशातील परीक्षा पद्धत ही मेमरी टेस्ट आहे. त्यामध्ये बदलाची गरज आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारत जगाला मार्गदर्शन करेल अशी सर्वांची अपेक्षा होती पण त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी योग्य पद्धतीने लक्ष न दिल्यामुळे आणि
मेकालेसारखी शिक्षण पद्धती देशावर लादली गेल्यामुळे देशाने या पद्धतीने वाटचाल केली. काही वर्षांपूर्वी आपल्या रुपयाला जगभरात किंमत नव्हती पण आज बरेच देश भारताचा रुपया स्वीकारत असून नजीकच्या काळात जगभरात तो स्वीकारला जाईल. असा मला विश्वास वाटतो. भारत ही जगातील सर्वात मोठी तिसरी आर्थिक अर्थव्यवस्था बनू शकेल पण त्या दृष्टीने कार्य करण्यासाठी तरुण पिढीने आपला सहभाग दर्शवण्याची गरज आहे. आरपीडी व जीएसएसचे नाव फक्त कर्नाटकातच नाही तर संपूर्ण देशभरात आहे” असेही ते म्हणाले.
कॉलेज आवारात आल्यानंतर त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेस फुले अर्पण केली. प्रसन्ना जोशी यांनी सर्वांचा परिचय करून दिला. त्यानंतर पाहुण्यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. जीएसएस महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एल. मजूकर यांनी संस्थेची माहिती देऊन उपस्थितांचे स्वागत केले तर चेअरमन डॉ. किरण ठाकूर यांच्या हस्ते पाहुण्यांचा शाल व समई भेट देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेल्या परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, कॉ. कृष्णा मेणसे आणि विठ्ठलराव याळगी यांचा आर्लेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याचबरोबर एसकेई सोसायटीच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिलेल्या भालचंद्र कलघटगी, आर. डी. शानभाग, विनायक आजगावकर, माधव कामत आणि कर्मचारी वर्गाचे प्रतिनिधी म्हणून प्राचार्य बी. एल. मजूकर व प्राचार्य ए. एम. पाटील यांचा आर्लेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सीएम त्यागराज यांनी बोलताना मुक्तकंठाने गौरव केला. “अनेक महणीय व्यक्तीनी त्याग करून उभारलेल्या या संस्थेत दिले जाणारे शिक्षण हे उच्च दर्जाचे आणि नैतिक मूल्य जपणारे आहे. म्हणूनच या संस्थेला हा स्वायत्तता दर्जा मिळत आहे” असे ते म्हणाले.
कुलसचिव राजश्री जैनापूर यानी या संस्थेला स्वायत्तता दर्जा मिळाला ही सुरुवात असून ती एक अभिमानास्पद गोष्ट आहे असे सांगितले.
समारंभाध्यक्ष किरण ठाकूर यांनी आपल्या भाषणाची सुरुवात हा आनंदाचा दिवस आहे असे सांगून दर्जेदार शिक्षण काय असते हे या संस्थेमधून शिकलेल्याना कळते, असे सांगितले. सावंतवाडीत सुरू झालेली ही संस्था बाबुराव ठाकूर, गंगाधरराव देशपांडे, अण्णासाहेब लठ्ठे, दिवाण बहादुर, जीवनराव याळगी, पुंडलिकजी कातगडे, वाय. के. प्रभू यांच्यासारख्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी लोकांनी बेळगावात आणली व वाढवली आहे. आज या संस्थेचा दबदबा महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तिन्ही राज्यात आहे. सुशिक्षित समाजापेक्षा सुसंस्कृत समाजाची गरज असून तो निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे, असे सांगितले.
आरपीडी महाविद्यालयाचे प्राचार्य ए. एम. पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. संस्थेच्या गिरी सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास राज्यपालांच्या पत्नी अनघा, बिहारचे ईडीसी किरण जाधव विशेष अधिकारी प्रितेश देसाई, यांच्यासह विद्यार्थी, कर्मचारी वर्ग आणि निमंत्रित उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *