बेळगाव : ‘भगवान श्रीकृष्ण हे आपले बंधू बलराम यांच्या सोबतच पृथ्वीवर प्रकट होतात असे वर्णन श्रीमद् भागवत या ग्रंथातील दहाव्या अध्यायात करण्यात आले आहे’ अशी माहिती इस्कॉनचे ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी सोमवारी सायंकाळी आपल्या व्याख्यानात दिली. बलराम जयंतीच्या निमित्ताने सोमवारपासून महाराजांचे कथाकथनास प्रारंभ झाला. इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळ आनंद मंदिरात आज पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून सोमवारी भगवान बलराम यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला.
“भगवंताच्या अवतरणास अनेक कारणे असली तरीही साधूंचे संरक्षण, दृष्टांचा विनाश आणि धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंत प्रकट होतात. द्वापर युगाच्या शेवटी पृथ्वीवर झालेल्या अनन्वित अत्याचाराने कंटाळून पृथ्वीने गायीचे रूप धारण केले आणि ती ब्रम्हाजींच्याकडे गेली तेव्हा ब्रम्हाजी क्षीरोदकशायी विष्णूंच्याकडे गेले तेव्हा त्यांनी सांगितलेली बलराम जन्माची कथा मी सांगतो” असे सांगून भक्ती रसामृत स्वामी महाराज म्हणाले की” भगवान विष्णू यांनी मी देवकीचा आठवा पुत्र म्हणून मथुरेत जन्माला येईन तर त्याचवेळी बलराम हे जे श्रीकृष्णाचेच अंश आहेत ते रोहिणीच्या गर्भातून जन्माला येतील. त्यासाठी श्रीविष्णुनी योगमाया शक्तीला बोलावून देवकीच्या गर्भाला रोहिणीच्या गर्भात स्थानांतर केले. हा गर्भपात नव्हता तर ते अदभुत स्थानांतर दिव्य स्थानांतर होते आणि अशा पद्धतीने बलरामांचा जन्म झाला” अशी माहिती महाराजांनी दिली.
बलराम जयंतीच्या निमित्ताने श्री श्री राधा गोकुळ आनंद मंदिर फुलांनी सजविण्यात आले आहे. शेकडो भक्तांच्या उपस्थितीत भजन, कीर्तन आणि कथानकाद्वारे बलराम जयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.