
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेमध्ये 20 ऑगस्ट या शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतिदिनी विविध कार्यक्रमांतून त्यांना आदरांजली देण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून शाळेच्या शेती विभागाचे प्रमुख व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अरुण बाळेकुंद्री उपस्थित होते. त्यांच्य हस्ते डॉक्टर दाभोळकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यानंतर इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘आम्ही सारे दाभोळकर’ या पथनाट्याच्या माध्यमातून दाभोळकरांच्या कार्याचा आढावा घेतला. त्याचबरोबर ‘विवेक सूर्य डॉक्टर नरेंद्र दाभोळकर’ या पोवाड्याचेही सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. याचे लेखन व दिग्दर्शन श्री. प्रसाद सावंत यांनी केले होते. यामध्ये गार्गी मोरे, श्रुतिका गुरव, गुंजन पाटील, नंदिनी बांदेकर, जिया कांबळे, संकल्प हळदणकर व सहावीचे विद्यार्थी सहभागी होते. यानंतर श्री. अरुण बाळेकुंद्री यांनी विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता विज्ञान निष्ठ व चिकित्सक रहावे, स्वतःच्या मन आणि मनगटावर विश्वास ठेवावा असे सांगितले. या दिनाच्या निमित्ताने इयत्ता तिसरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा विज्ञान कथा सादरीकरण कार्यक्रमही घेण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी कथा, कविता यांचे उत्स्फूर्त सादरीकरण केले. यावेळी शाळेच्या शिक्षण संयोजक नीला आपटे, मुख्याध्यापक गजानन सावंत एन. सी. उडकेकर सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अथर्व हवळ्ळांनाचे यांने केले.
Belgaum Varta Belgaum Varta