बेळगाव : फायनान्समधून कर्ज घेतलेल्या स्वयंसहाय्यता संघटनेच्या महिलांना कर्जदारांकडून त्रास दिला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आज गोकाक तालुक्यातील सावलगी गावातील महिलांनि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.
गोकाक तालुक्यातील सावलगी गावातील स्वयंसहाय्यता संस्थेच्या महिलांनी आर्थिक छळ होत असल्याचा आरोप करत बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन केले. बचत संस्थांना दिलेले कर्ज वसूल करण्यासाठी येणाऱ्या वसुली अधिकाऱ्यांकडून महिलांना अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करण्यात येत आहे, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी बोलताना बचत गटाच्या आशा हरिजन यांनी सांगितले की, आम्ही सर्वजणी रोजंदारीच्या मजुरीवर अवलंबून आहोत. जीवनातील अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी फायनान्स कंपनीकडून आम्ही कर्ज घेतले असून आतापर्यंतची सर्व थकबाकी पूर्ण केली आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक कामे खोळंबल्याने कर्ज फेडणे मुश्किल झाले आहे. मात्र अशा परिस्थितीत फायनान्स कर्मचारी शिवीगाळ करत आहेत. शिवाय फोनद्वारे धमक्या देत आहेत, असा आरोप त्यांनी केला. या आंदोलनात सावलगी गावातील आशा हरिजन, महादेवी सुनगार, लक्ष्मीबाई बडिगेर, ज्योती गोरवरा, महादेवी कुंभार आदींसह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta