बेळगाव : श्रीराम सेनेचे जिल्हा मुख्य सचिव आणि गोकाक तालुकाप्रमुख रवी पुजारी (वय २७) यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. त्यांच्यावर गोकाक शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोकाक शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
रवी पुजारी हे दोन दिवसांपूर्वी गोकाक शहरातील एका ढाब्यावर जेवणासाठी गेले होते. जेवण करत असताना त्या ठिकाणी आलेल्या एका टोळक्याने त्यांच्याशी भांडण काढून चाकूने हल्ला केला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. चेहऱ्यावर तसेच हातावर चाकूने वार करण्यात आल्याने त्यांना गोकाक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती समजताच श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रविकुमार कोकितकर, विनय अंग्रोळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट देऊन त्यांची विचारपूस केली.
याप्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेले नाही; मात्र श्रीराम सेनेचे जिल्हा प्रधान कार्यदर्शी आणि गोकाक तालुका अध्यक्ष असलेल्या रवी पुजारी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.