

बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संगीत भजन स्पर्धेचा समारोप शनिवारी सायंकाळी होणार आहे. या स्पर्धेत एकंदर 28 संघानी भाग घेतला असून त्यामध्ये बेळगाव शहर, बेळगाव, खानापूर व चंदगड तालुक्यात्तील संघांचा समावेश आहे. बुधवार व गुरुवारी एकंदर अकरा महिला भजनी मंडळानी आपली कला सादर केली. शुक्रवार व शनिवार हे दोन दिवस पुरुष गटासाठी स्पर्धा होत आहेत. शुक्रवारी नऊ संघानी आपली कला सादर केली. त्यामध्ये रामकृष्ण हरी भजनी मंडळ जांबोटी, श्री रवळनाथ भजनी मंडळ गोल्याळी, श्री महालक्ष्मी भजनी मंडळ, काटगाळी, सिद्धेश्वर संगीत भजनी मंडळ निडगल, धन्य ते माता पिता बाल भजनी मंडळ बा. कणूर, विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ कुपटगिरी, तुकाराम भजनी मंडळ माणगाव, हनुमान संगीत भजनी मंडळ मोदेकोप आणि जय हनुमान कलाप्रेमी मंडळ करंजगाव या संघांचा समावेश होता. शेकडो महिला व पुरुषांनी या स्पर्धांना उपस्थित राहून संगीत भजनांचा आनंद लुटला. शुक्रवारी वाचनालयाचे उपाध्यक्ष विनोद गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष गोविंदराव राऊत यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. शनिवारी सात संघानी आपली कला सादर केल्यानंतर लगेचच बक्षीस समारंभ होणार आहे. महिला व पुरुष या दोन्ही गटासाठी रोख रक्कमेची समान बक्षिसे दिली जाणार आहेत. या समारंभास व भजनी मंडळानी उपस्थित राहावे असे आवाहन सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे. काल करंजगावच्या महिला गटातील विनायक पाटील या साडेतीन वर्षे वयाच्या बालकाने उत्कृष्ट तबला वादन करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
Belgaum Varta Belgaum Varta